|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रजपूतवाडीजवळ स्कूल बस खाली सापडून दोघे ठार

रजपूतवाडीजवळ स्कूल बस खाली सापडून दोघे ठार 

वार्ताहर/ प्रयाग चिखली

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील रजपूतवाडी नजिकच्या हॉटेल ‘ग्रिनफिल्ड’ समोर ‘संजीवन नॉलेज सिटी’च्या भरघाव स्कूलबसने मोटारसायकलवरील बाप-लेकांना चिरडले. या अपघातात केर्ले (ता. करवीर) येथील श्रीपती महादेव गोळे (वय 70) व त्यांचा मुलगा पंडीत श्रीपती गोळे (वय 35) हे जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी 9 वाजता घडली. घटनास्थळी करवीरचे पोलीस निरिक्षक डी. एस. जाधव यांनी उपस्थित राहून पंचनामा केला.

याबाबतची अधिक माहिती अशी केर्ले (ता. करवीर) येथील प्रगतशील शेतकरी तसेच केर्ले विकास संस्थेचे माजी चेअरमन श्रीपती गोळे व त्यांचा मुलगा पंडीत गोळे हे शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास शेतातील काकडी व इतर भाजीपाला घेऊन मोटारसायकलवरुन कोल्हापूरकडे विक्रीसाठी जात होते. ते हॉटेल ग्रीनफिल्ड (रजपूतवाडी) जवळ आले असता एका मोटारसायकलस्वाराबरोबर त्यांची धडक झाली. दरम्यान याचवेळी ‘संजीवन’ नॉलेज सिटीची स्कूलबस त्या ठिकाणाहून पन्हाळय़ाच्या दिशेने भरघाव वेगाने जात होती. दोन मोटारसायकलस्वार एकमेकाला धडकले. त्यावेळी पंडीत गोळे यांची गाडी थेट स्कूलबसच्या चाकाखाली गेली. यावेळी स्कूलबसचे चाक पंडीत गोळे व वडिल श्रीपती गोळे यांच्या डोक्मयावरुन गेल्याने ते दोघेही जागीच ठार झाले. यावेळी अपघातातील दुसरे मोटारसायकलस्वारही जखमी झाले आहेत.

यावेळी बसचालकानेही बचावासाठी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेण्याच्या प्रयत्नात बस रस्त्यावरुन खाली जावून मोरीला धडकली. त्यामुळे बसचे नुकसान झाले. बस मोरीला धडकून थांबली. अन्यथा बस पलटी होऊन स्कूलबसमधील विद्यार्थ्यांना मोठा अपघात झाला असता यावेळी बाप-लेकांचे मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. स्कूलबसमधील विद्यार्थी इतर वाहनाने परत गेले तर अपघातानंतर उपस्थितांनी स्कूलबसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. दरम्यान प्रक्षुब्ध जमाव पाहून स्कूलबसच्या ड्रायव्हरने पळ काढला. अपघाताची बातमी केर्ले गावात समजल्यावर काही वेळातच शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. करवीर पोलिसांनी तातडीने यंत्रणा राबवून योग्य ती कार्यवाही केली.

श्रीपती गोळे यांना तीन मुलगे होते. त्यापैकी. मयत पंडीत गोळे हे तिसऱया क्रमांकाचे (सर्वांत लहान) होते. पंडीत हा विवाहीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी आहे. तो 12 वी पर्यंतचे शिक्षण घेऊन आय.टी.आय. इलेक्ट्रिशन टेड करून सध्या खासगी नोकरीत होता. नोकरी सांभाळत वडिलांना शेतीकामात तो मदत करत होता. त्याच अनुषंगाने वडिलांबरोबर भाजीपाला विक्रीसाठी कोल्हापूरला जात असताना दोघा बाप-लेकांवर काळाने झडप घातली.

अनर्थ घडला असता…

विद्यार्थी वाहतूक करताना झालेल्या या अपघातातील स्कूलबस रस्त्यावरुन खाली नाल्याच्या दिशेने सरकली आणि एका मोरीला धडकली व थांबली. त्यापुढे बस गेली असती तर पलटी होऊन विद्यार्थ्यांना मोठा अपघात घडला असता.

रस्त्याच्या साईटपट्टय़ांची चर्चा

ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी रस्त्याच्या साईटपट्टय़ा भरलेल्या नाहीत. पावसाळय़ात पुराच्या पाण्यामुळे रस्त्याच्या साईटपट्टय़ांवरील मुरुम वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी गाडी रस्त्यावरुन खाली घेणे धोकादायक बनले आहे. आजच्या अपघातासाठी कदाचित साईट पट्टय़ांची स्थितीच कारणीभूत असावी, अशी चर्चा उपस्थितात होती.

Related posts: