|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पंधरा अतिक्रमणे हटवली

पंधरा अतिक्रमणे हटवली 

वार्ताहर/ कराड

गांडूळ खत प्रकल्पाकडे जाणाऱया रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुक्रवारी सकाळी शुभारंभ झाल्यानंतर दुपारी या रस्त्यात असलेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम नगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आली. शुक्रवारी एकूण 15 अतिक्रमणे काढण्यात आली, तर शनिवारीही मोहीम सुरुच रहाणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

   छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या प्रवेशद्वारापासून बाराडबरे येथील गांडूळ खत प्रकल्पाकडे जाणाऱया रस्त्याच्या डांबरीकरणासाठी नगरपालिकेच्या वतीने सुमारे 73 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळीच या कामाचा शुभारंभही करण्यात आला. मात्र जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या घराच्या समोरच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील काही घरे, शेड व खोक्यांचे रस्त्यात अतिक्रमण झालेले आहे. रस्त्याचे काम करताना या अतिक्रमणांचा अडथळा होऊ नये यासाठी पालिकेच्या वतीने येथील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

 पालिकेने मोहीम सुरू केल्यावर अनेक लोकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली तर पालिकेच्या कर्मचाऱयांनी उरलेली अतिक्रमणे काढली. शुक्रवारी जवळपास 6 खोकी, शेड व घरे अशी एकूण 15 अतिक्रमणे काढण्यात आली. शनिवारीही अतिक्रमण हटावची मोहीम सुरुच राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्याचे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts: