|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऍटर्नी प्रीत भरारा यांची पदावरून हकालपट्टी

ऍटर्नी प्रीत भरारा यांची पदावरून हकालपट्टी 

वॉशिंग्टन  :

 बराक ओबामा प्रशासनाने नियुक्त केलेल्या 46 अधिवक्त्यांचा राजीनामा ट्रम्प प्रशासनाने मागितला आहे. ओबामा यांनी निवड केलेल्या अधिकाऱयांना हाकलून त्या जागी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मर्जीतील अधिकाऱयांच्या नियुक्ती करण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये एकूण 93 ऍटर्नी (अधिवक्ता) आहेत. यामध्ये भारतीय वंशाचे प्रीत भरारा यांचा देखील समावेश आहे. ट्रम्प प्रशासनाने आपल्याला राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र राजीनामा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने आपल्याला पदावरून काढून टाकण्यात आले, असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले. मूळ भारतीय असणाऱया 48 वर्षीय प्रीत भरारा यांनी अनेक उच्च प्रतिष्ठित प्रकरणे आणि तपासांमधून आपली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केली होती. यामध्ये विदेशातील संबंधित प्रकरणे, संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि अमेरिकेतील नेत्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांचा समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर भरारा यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना आपल्या पदावर कायम राहण्यास सांगण्यात आले होते, असे अमेरिकन प्रसारमाध्यमांनी म्हटले होते.

अमेरिकेतील 93 अधिवक्तांपैकी काहींनी अगोदरच आपले पद सोडले आहे. आता प्रशासनात सुधारणा करण्यासाठी ट्रम्प सरकारने 46 अधिवक्तांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन प्रशासनाने आपल्या सुरुवातीच्या कार्यकाळातही अधिवक्तांची हकालपट्टी केली होती असे न्याय मंत्रालयाच्या प्रवक्ता सारा इस्गर फ्लोर्स यांनी म्हटले. अटर्नी भरारा यांची ओबामा यांनी 2009 मध्ये नियुक्ती केली होती. ते न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्हय़ात कार्यरत होते. भारतात जन्मलेल्या रजत गुप्ता यांना 2012 मध्ये दोषी ठरविण्यात भरारा यांची महत्त्वाची भूमिका होती.