|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुंबईसह जिल्हय़ातील विविध चोऱयांमधील आरोपी जाळ्यात

मुंबईसह जिल्हय़ातील विविध चोऱयांमधील आरोपी जाळ्यात 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हाभरात चोरटय़ांनी नव्याने उच्छाद मांडला असताना चोरीच्या अनेक गुन्हे दाखल असणाऱया रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गुहागर पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. या आरोपीने कळंबोली, ठाणे, कळवा, खारघरमधील चोऱयांची कबुली या दिली असून जिल्हय़ातील अनेक चोऱया उघड होण्याचीही शक्यता आहे.

   पर्शराम विलास शेंडगे (34, देवधर, गुहागर) असे या आरोपीचे नाव आहे.  गुहागर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील पर्शराम शेंडगे हा गुहागरमधील वास्तव्याचे ठिकाण बदलून जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. मात्र, हे पथक  पोहचण्याच्या आतच शेंडगे एका टँपोमधून सामान घेऊन पळून गेला. त्यानंतर पथकाने तातडीने हालचाली करत गणेशखिंड चेक पोस्ट येथे संपर्क साधून हा टेंम्पो अडवला. टेंपोची झडती घेतली असता त्यात घरसामान व मोठय़ा प्रमाणात बँकेत दागिने गहाण ठेवून कर्ज घेतल्याच्या पावत्या सापडल्या. 

      टेंपो पकडला पण आरोपी आधीच पळाला होता…

    पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती तर लागली मात्र तत्पुर्वीच शेंडगे चिपळूण रेल्वे स्टेशनकडे रवाना झाला होता.  आरोपी निसटून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने याविषयीची माहिती ताबडतोब चिपळूण पोलीस स्टेशनला कळवण्यात आली. महत्वाची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब पावले उचलत रेल्वे स्थानकावर शेंडगेला ताब्यात घेतले. शेंडगेच्या प्राथमिक चौकशीत त्याने कळंबोली, ठाणे, कळवा, खारघर येथील चोऱयांची कबुली दिली आहे. गहाण टाकलेले दागिने या चोरीतीलचे असल्याचेही त्याने सांगितले.

    नजिकच्या कालावधीत गुहागर परिसरामध्ये घरफोडीचे गुन्हे घडलेले असल्याने व शेंडगे याच परिसरात वास्तव्यास असल्याने त्याला गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुहागर पोलीस पुढील तपास करत आहेत.

      जिल्ह्याबाहेरही गुन्हे

  शेडगेविरूद्ध गुहागर,चिपळूण पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल आहेत. ठाणे, नवी मुंबई येथेही त्याच्याविरूद्ध गुन्हे आहेत. शेंडगे वारंवार वास्वव्याचे ठिकाण बदलत असतो. ज्या जिल्ह्यामध्ये तो वास्तव्य करतो त्या जिल्ह्याच्या बाहेर जाऊन गुन्हे करण्याची त्याची पद्धत असल्याचे पोलिसांसमोर आले आहे. सध्या तो गुहागरहून कळंबोली या ठिकाणी जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक एस एल पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी मोरे, दिनेश आखाडे, उदय वाजे, वैभव मोरे, अमोल भोसले, दत्ता कांबळे, चिपळूण पोलीस ठाण्यातील कर्मचारी तडवी व गुहागर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

  वाढत्या चोऱया रोखण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम

  रत्नागिरी शहरासह चिपळूण, गुहागर तालुक्यामध्ये घरफोडी चोरीच्या प्रमाणात वाढ होत होती. हे रोखण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या अभिलेखाची पडताळणी केली. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील टॉप 10 गुन्हेगारांचा आढावा घेण्यात आला. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक खास पथक तयार करण्यात आले. अखेर पोलिसांच्या प्रयत्नाला यश येत एकाला अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अशा सर्वच चोऱयांची उकल  व्हावी, अशी अपेक्षा व्यापाऱयांसह नागरिक व्यक्त करत आहेत.