|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पाणी पुरवठय़ासाठी टँकर खरेदी करण्याचा प्रस्ताव कागदावरच

पाणी पुरवठय़ासाठी टँकर खरेदी करण्याचा प्रस्ताव कागदावरच 

प्रतिनिधी/ बेळगाव

मागील वर्षी शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने दोन पाण्याचे टँकर खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली होती.  महापालिकेने आता महापौर-उपमहापौर आणि आयुक्तांसाठी वाहने खरेदी केली आहेत. पण नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे टँकर खरेदी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. टँकर खरेदीचा प्रस्ताव कागदावर ठेवून कंत्राट पद्धतीने टँकरने पाणीपुरवठा करून अधिकाऱयाचे खिसे भरणार का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

शहरातील विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होवू लागली आहे. यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. पाणी पुरवठामंडळाकडे एकच टँकर असल्याने पाणीपुरवठा करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात आठ ते पंधरा दिवसाआड  पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर विहिरींद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पण विहिरींचे पाणी आटले असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

 शहरात भूमीगत विद्युतवाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत असल्याने जलवाहिन्यांची मोडतोड होत आहे. परिणामी जलवाहिन्यांना गळत्या लागून विविध परिसरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. जलवाहिन्यांची दुरूस्ती करूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याने मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे.

मागील वषी पाण्याची समस्या निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच चार टँकर कंत्राट पद्धतीने घेण्याची तरतूद करण्यात आली होती.  32 वॉर्डांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाने 91 लाख 69 हजार रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. रोज आठ टँकरने पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करून एक टँकर पाणी पुरवठा करण्यासाठी 398 रुपये दर ठरविण्यात आला होता. तीन महिने पाणीपुरवठा करण्यासाठी 91 लाख 69 हजार खर्च अपेक्षित होता. पण इतक्या रकमेत चार नवीन टँकर खरेदी करून सर्व वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा करता येणे शक्य असताना अधिकाऱयांनी दुर्लक्ष करून भाडेतत्वावर टँकर घेण्याचे नियोजन केले होते.

यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव रद्द करून दोन नवीन टँकर खरेदीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली होती. पण याची अंमलबजावणी करण्याकडे महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाने साफ दुर्लक्ष केले आहे. पाण्याच्या टँकरसह महापौर-उपमहापौर आणि आयुक्मतांसाठी वाहने खरेदी करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. महापौर-उपमहापौर आणि आयुक्तांसाठी वाहने खरेदी करण्यात आली. पण टँकरची गरज असतानादेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.