|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जित्याची खोड

जित्याची खोड 

प्रवासात वाचायला पुस्तक असलं तर वेळ छान जातो.

मागच्या आठवडय़ात गावाला जायचं होतं. जाताना काही खरेदीला म्हणून निघालो. घराजवळ एक रद्दी पुस्तकांचं दुकान आहे. तिथे सहज रेंगाळलो. त्या दिवशी नशीब जोरावर असेल. ‘मिडसमर नाईट्स ड्रीम’ हे शेक्सपिअरचे नाटक आणि दोन जुन्या रहस्यकथा शंभर रुपयात मिळाल्या.

शेक्सपिअरच्या नाटकात कठीण शब्द खूप असणार म्हणून ते घरीच ठेवले. प्रवासाला निघताना पिशवीत रहस्यकथा ठेवल्या. घराला कुलूप लावून आम्ही निघालो. आज निघून उद्या रात्री परत येणार.

अपेक्षेनुसार छान सीट्स मिळाल्या होत्या. एक दोन स्टेशन्स मागे पडल्यावर आणि न्याहारी-चहा झाल्यावर आम्ही पुस्तकं काढली आणि वाचू लागलो. वाचता वाचता अर्धा तास छान गेला असेल. एका पानावर आलो आणि मी जाम दचकलो.

पुस्तकाच्या बांधणीच्या फटीतून हलक्मया पावलाने एक ढेकूण महाशय पानावर येत होते. बाप रे. पुस्तकात ढेकूण. हे राम. मी त्या महाशयांना खिडकीबाहेर झटकून टाकले आणि पुस्तक उलटसुलट फडफडवून आणखीन एखादा ढेकूण आहे का ते शोधायचा प्रयास केला. माझ्या डोळय़ांसमोर पुढचे भयाण चित्र उभे राहिले. रद्दीचे कळकट दुकान आठवले. या पुस्तकात ढेकूण असेल तर शेक्सपिअरच्या नाटकात देखील असू शकेल. आम्ही जवळपास अठ्ठेचाळीस तास घराबाहेर आणि शेक्सपिअर आमच्या घरात. प्रवासाचे सामान भरताना शेक्सपिअरला कॉटवर भिरकावून आलो होतो मी. त्याच्या पोटात ढेकूण असले तर ते तिथून निघून गादीत शिरतील. त्यांचा मधुचंद्र पार पडेल. उद्या रात्री आम्ही दमून घरी पोचल्यावर आमचे काय होईल. पेस्ट कंट्रोलवाले लोक बोलवावे लागतील आणि हजारभर रुपयांचा भुर्दंड बसेल.

या रहस्यकथा आणि शेक्सपिअर महाशय मला चांगलेच महाग पडणार तर… मी तिरप्या डोळय़ांनी बायकोकडे पाहिले. ती वाचनात गुंग होती. तिला ढेकणाबद्दल सांगितले. स्वस्त पुस्तके जमवण्याच्या माझ्या छंदावर तिने चार ताशेरे ओढून घेतले. इथून पुढे फक्त नवी कोरी पुस्तके पदरमोड करून खरेदी करण्याची मी शपथ घेतली.

आम्ही घरी परतलो. पण एकही ढेकूण आम्हाला चावला नाही. तेव्हा शेक्सपिअरचे नाटक स्वस्तातच मिळाले असे म्हणायला हवे. पुढच्या आठवडय़ात पेन्शन आली की पुन्हा त्या रद्दीच्या दुकानात चक्कर मारीन म्हणतो. मात्र पुस्तक नीट बघून तपासून घेईन.

Related posts: