|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सटमटवाडीतील शाळा बंद ठेवणार

सटमटवाडीतील शाळा बंद ठेवणार 

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात माकडतापाची साथ पसरत आहे. सहा रुग्ण आतापर्यंत दगावले आहेत. ही साथ सहय़ाद्री पट्टय़ातील अन्य गावात पसरू नये व शहरापर्यंत ही साथ येऊ नये, यासाठी दक्षता घ्या. महिनाभरात चाकरमान्यांची लगबग व लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आतापासूनच पावले उचला, अशा सूचना काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांनी नवनिर्वाचित सभापती रवींद्र मडगावकर व उपसभापती निकिता सावंत यांना केल्या.

मडगावकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.  बांदा सटमटवाडी येथे माकडतापाची साथ असल्याने या भागातील शाळा बंद ठेवण्याच्याही सूचना त्यांनी शिक्षणाधिकाऱयांना दिल्या. त्यानंतर शिक्षणाधिकाऱयांनी शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले.

सावंतवाडी पंचायत समितीवर काँग्रेसचे सभापती व उपसभापती बिनविरोध निवडून आले आहेत. सभापतीपदाचा कार्यभार रवींद्र मडगावकर व उपसभापती निकिता सावंत यांनी स्वीकारला. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष परब यांनी सभापती व उपसभापतींच्या दालनात भेट देऊन पंचायत समितीच्या कारभाराचा आढावा घेतल्या. तालुक्याच्या सर्व गावांचा समान विकास करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मडगावकर यांनी पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱयांकडून कामाची माहिती घेतली. शिक्षण विभागाचा आढावा घेतला. शिक्षण विभागात एकच विस्तार अधिकारी आहे. तीन जागा रिक्त आहेत. त्याबाबत वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या.

   बांद्यातील शाळा बंद ठेवणार

बांदा सटमटवाडीत माकडतापाची साथ आहे. शाळकरी मुलांनाही ताप येत आहे. त्यामुळे या सटमाटवाडीतील प्राथमिक शाळा बंद ठेवण्याच्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष म. ल. देसाई, मनोहर झेंडे यांनी सभापती मडगावकर यांना दिले. याबाबत मडगावकर यांनी तात्काळ गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई यांना सूचना केल्या. देसाई यांनी सटमटवाडीतील शाळा बंद ठेवण्यात यावी. शाळा व्यवस्थापनाने तात्काळ निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. यावेळी उपसभापती निकिता सावंत, गुरू सावंत, सूर्यकांत सावंत, गुलाबराव गावडे, सुनील मडगावकर, राजू मडगावकर, नितीन गावडे, पं. स. सदस्य संदीप गावडे, चौकुळ सरपंच गावडे, नेतर्डे सरपंच नाईक, आबा पिळणकर उपस्थित होते.