|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » साटम महाराज पुण्यतिथी सोहळय़ाची शानदार सांगता

साटम महाराज पुण्यतिथी सोहळय़ाची शानदार सांगता 

ओटवणे : शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेले योगियांचे योगी दाणोली नगरीच्या साटम महाराजांच्या 80 व्या पुण्यतिथी सोहळय़ाची सांगता मंगळवारी मध्यरात्रीनंतर नेत्रदीपक व भक्तिमय अशा पालखी सोहळय़ाने झाली. दाणोली बाजारपेठेत रात्री 10 वाजल्यापासून मध्यरात्री उशिरापर्यंत तब्बल चारतास चाललेल्या या पालखी सोहळय़ाला भाविकांनी अलोट गर्दी केली होती. पालखी मार्गावरील आकर्षक विद्युत रोषणाई, नेत्रदीपक आकर्षक अशा फटाक्यांची आतषबाजी बॅन्डपथकासह वाजतगाजत, नाचत वारकरी भजनासह साटम महाराजांचा होणारा जयघोष ही पालखी सोहळय़ाची खास वैशिष्टय़ ठरली.

या सोहळय़ापर्यंत महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. साटम महाराजांच्या समाधी मंदिर, निवासस्थानी कीर्तन व भजनाचा गजर रात्रीही कायम होता. त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम झाला. यावेळी मूळ दाणोलीतील कै. दत्ताराम लाडू बिले यांनी लिहिलेल्या साटम महाराजांच्या जीवन चरित्रावरील ‘समर्थ साटम लीला’ या तीन अंकी नाटय़ पुस्तिकेचे प्रकाशन बाळराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश राकेश बिले, कुडाळचे प्रसिद्ध वकील राजीव बिले, साटम महाराज ट्रस्टचे विश्वस्त ऍड. श्यामराव सावंत, भरत गावडे, विकास गोवेकर आदी उपस्थित होते.

पालखी सोहळय़ापूर्वी दाणोलीतील कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय दाणोली बाजार शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाने दलदर्शन, कृष्णदर्शन, गोफनृत्य, विठ्ठल दर्शन, साटम महाराज दर्शन, साडी डान्स, राधाकृष्ण आदी लेझीमचे प्रकार सादर केले. सावंतवाडी संस्थानचे बाळराजे भोसले यांच्या हस्ते या पुण्यतिथी सोहळय़ाचे खास आकर्षण असलेल्या पालखी सोहळय़ास प्रारंभ झाला.

साटम महाराज ते समाधीमंदिर ते महापुरुष मंदिर व महाराजांचे निवासस्थानपर्यंत चार तास चाललेल्या या पालखी सोहळय़ास साटम महाराजांचा जयजयकार सुरू होता. सोबत सुरू असलेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीने या पालखी सोहळय़ाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. सावंतवाडी सबनीसवाडा खेमराज बॅन्ड पथकाने क्लासिकल व पारंपरिक वादनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. ही पालखी समाधी मंदिरात आल्यानंतर पालखी सोहळय़ाची सांगता झाली. मध्यरात्रीनंतर कलेश्वर दशावतार नाटय़ मंडळाचा नाटय़प्रयोग झाला.