|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » केर्बर स्पर्धेबाहेर, व्हेस्निना, व्हीनस, मुगुरुझाची आगेकूच

केर्बर स्पर्धेबाहेर, व्हेस्निना, व्हीनस, मुगुरुझाची आगेकूच 

वृत्तसंस्था/ इंडियनवेल्स

रशियाच्या एलिना व्हेस्निनाने द्वितीय मानांकित जर्मनीच्या अँजेलिक केर्बरचे आव्हान संपुष्टात आणत बीएनपी पेरिबस इंडियनवेल्स ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. व्हीनस विल्यम्स, वोझ्नियाकी, प्लिस्कोव्हा, मुगुरुझा यांनीही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले आहे.

14 व्या मानांकित व्हेस्निनाने पहिल्यांदाच टॉप तीनमधील खेळाडूंवर विजय मिळविला आहे. तिने केर्बरवर 6-3, 6-3 अशी मात करताना पाचवेळा सर्व्हिस भेदली. केर्बर या स्पर्धेत लवकर पराभूत झाली असली तरी जागतिक क्रमवारीत ती पुन्हा अग्रस्थानावर पोहोचणार आहे. तिची पुढील लढत अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सशी होईल. व्हीनसने चीनच्या पेंग शुआईचा 3-6, 6-1, 6-3 असा पराभव केला. व्हेस्निना-व्हीनस यांच्यात आतापर्यंत पाच लढती झाल्या असून त्यापैकी व्हेस्निनाने 3 लढती जिंकल्या आहेत.

जागतिक तृतीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हानेही आगेकूच केली असून तिने 15 व्या मानांकित टिमीया बॅकसिन्स्कीचा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये 1-5 अशी पिछाडीवर असतानाच टिमीयाने माघार घेतली. तिची पुढील लढत स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाशी होईल. मुगुरुझाने युक्रेनच्या एलिना स्विटोलिनावर 7-6 (7-5), 1-6, 6-0 अशी मात केली. कॅरोलिन वोझ्नियाकीनेही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना अमेरिकेच्या मॅडिसन कीजवर 6-3, 6-3 अशी मात केली. फ्रान्सच्या क्रिस्टिना लॅडेनोव्हिकशी तिची पुढील लढत होईल. लॅडेनोव्हिकने लॉरेन डेव्हिसचा 6-3, 6-3 असा पराभव केला. आठव्या मानांकित स्वेतलाना कुझनेत्सोव्हाने कॅरोलिना गार्सियाचा 6-1, 6-4, ऍनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हाने पाचव्या मानांकित डॉमिनिका सिबुल्कोव्हाचा 6-4, 3-6, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली.