|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जन्मदातेच जेव्हा काळ बनतात…

जन्मदातेच जेव्हा काळ बनतात… 

सुभाष देशमुखे/ कराड

आई आपलं सर्वस्व तर बापही घरा-दाराचं अस्तित्व… आईकडे अश्रुंचे पाट असतात पण बापाकडे संयमाचे घाट असतात… कुटुंब व्यवस्थेतील सर्वात विश्वासार्ह नाती म्हणून या दोन्ही नात्यांकडे पाहिलं जात. मात्र घरादाराचं अस्तित्व असणारा बाप आणि सर्वस्व असणारी आईच जेव्हा काळ बनते, तेव्हा समाजमन सुन्न होते. काळय़ाकुट्ट रात्रीच्या अंधारात तीन चिमुकल्यांना संपवणाऱया भोंगाळे दाम्पत्याच्या प्रुर कृत्याने सारा जिल्हा हादरला शिवाय त्या चिमुकल्यांचा मृत्यूही जिव्हारी लागला.

दिले अस्तित्व मजसी तुम्ही…

लहानाचे ते मोठे केले,

काढूनी चिमटे पोटाला स्वतःच्या

पोट माझे सदा भरले…

घालूनी चादर चुकांवर माझ्या…

योग्य दिशेचे मार्गदर्शन केले,

येणाऱया संकटांची चाहुल दिसताच

संकटांना त्या स्वतःवर तुम्ही ओढविले…

जन्मदात्या आई-वडिलांवर अशा हजारो कविता आहेत. या कवितांपैकी एका कवितेतील वरील ओळी खऱया अर्थाने मुलांसाठी आई-वडिल काय असतात, हे दर्शवितात. मात्र या ओळी पुरत्या खोटय़ा ठरवणारी दुर्देवी घटना मंगळवारी कराडात घडली. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावावरून कराडात उदरनिर्वाहासाठी अमोल भोंगाळे पत्नी मिनाक्षीसह आला. हर्ष…श्रवण…या दोन गोंडस मुलांसह लक्ष्मीच्या रूपाने एक मुलगी दोघांच्या आयुष्यात आली. तीन मुलांसह पती-पत्नीचा संसार सुरू असतानाच दुर्देवाचा फेरा सुरू झाला तो अमोलच्या कारनाम्याने.

एका बीअरबारमध्ये नोकरी करणाऱया अमोलने भिशीसारख्या आर्थिक चक्रव्युहात पैसे अडकवले. पैशाला पैसा जोडण्यापेक्षा तो इकडचा पैसा तिकडे करू लागल्याचे पोलीस तपासात समोर आले. आर्थिक व्यवहार एकदा फसला की त्यातून सावरणे हिताचे ठरते अन्यथा तो आयुष्य संपवणारा ठरतो. नेमकं हेच सूत्र अमोलच्या लक्षात आलं नाही आणि तो दिवस जातील तसा आर्थिक व्यवहारात अडकत गेला. यातूनच त्याच्यावर अनेकांचे कर्ज झाले. हा सगळा उपद्व्याप करताना अमोलच्या तीन चिमुकल्या मुलांचा याच्याशी काडीमात्र संबध नव्हता. अमोलवर आलेल्या आर्थिक संकटाची त्याने पत्नी मिनाक्षीला कल्पना दिली असल्याचेही पोलीस सांगतात.

सोमवारी अमोलने पत्नीला आत्महत्येचा विचार सांगितला मात्र पत्नी मिनाक्षीने त्यास नकार दिला असे अमोलने पोलिसांसमोर सांगितले आहे. मिनाक्षीचा नकार येताच त्याने तिला भावनाविवश करत आत्महत्येसाठी तिची मानसिकता तयार केल्याचेही समोर येत आहे. मंगळवारी तीन मुलांना संपवून आपण आयुष्याचा शेवट करायचा म्हणून ते रात्रीच्या काळय़ाकुट्ट अंधारात बाहेर पडले. वास्तविक समाजात आर्थिक व्यवहारावरून अनेक घटना घडत असतात.

खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेकजण गाव सोडतात… पोलिसात तक्रार करतात पण आपल्यावर आलेले संकट मुलांवर येऊ देत नाहीत. भोंगाळे दाम्पत्याने नेमके याच्या उलट विचाराची चक्रे फिरवत माणुसकीला हादरवणारा निर्णय घेतला. रात्री दोनच्या सुमारास ते बाहेर पडले. चार महिन्यांची मुलगी व दीड वर्षांच्या श्रवण बालवयातील स्वप्नवत अशी झोप घेत होते तर साडेतीन वर्षांचा हर्ष आई-वडील नेत आहेत म्हणून त्यांच्यासोबत पावले टाकू लागला. अवघ्या काही वेळातच पती-पत्नीने निष्ठुरपणे कोणताही विचार न करता तिनही मुलांना नदीत फेकले.

अवघ्या 22 तासात भोंगाळे दाम्पत्याने आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेत तीनही मुलांना संपवले. त्यांचे हे कृत्य निश्चितच समाजाला कापरे भरवणारे आहे. या घटनेत अमोल भोंगाळे हा बचावला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशीचे सत्र सुरू केले. मुलांना मारल्याचा पश्चाताप होत नाही का? या पोलिसांच्या प्रश्नावर उत्तर देताना अमोलच्या चेहऱयावरील भाव जराही बदलत नाहीत. तो म्हणतो त्यांना संपवले… आता मी सुद्धा स्वतःला संपणार. समाजात होणाऱया अपमानास्पद चर्चेमुळेच हे निष्ठूर पाऊल त्याने उचलल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. मात्र तेवढय़ावरच न थांबता या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. सध्या तरी ही घटना समाजातील प्रत्येक घटकास विचार करायला लावते. तो विचार करताना अशा घटना घडू नयेत म्हणून कोणी प्रसंगावधान राखून पुढाकार घेईल का? याबाबत पोलीस-महसूल प्रशासनाकडून मंथन सुरू आहे.

कराडचे समाजमन हादरले

भोंगाळे दाम्पत्याने पोटच्या तीन मुलांना नदीत टाकून स्वत:लाही नदीत लोटून देत क्रौर्याची परिसीमा गाठली. या घटनेचे वृत्त समजताच येथील समाजमन पुरते हादरले आहे. बुधवारी शहरात दिवसभर याच घटनेची चर्चा सर्व स्तरात सुरू होती. महिला वर्गातही या दुर्देवी घटनेने प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत होती.