|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » मराठीच्या ‘अभिजात’दर्जाबाबत केंद्रावर दबाव आणावा

मराठीच्या ‘अभिजात’दर्जाबाबत केंद्रावर दबाव आणावा 

पुणे / प्रतिनिधी :

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र सरकार आणि त्याचे प्रमुख म्हणून आपण काही अधिकृत निवेदन केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. आपण ते करावे. तसेच या मुद्दय़ावर आपल्या नेतृत्वाखाली आपले सर्वपक्षीय खासदार यांनी यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, अशी अपेक्षा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीच्या समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

 याबाबतच्या पत्रात ते म्हणतात, महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ असा दर्जा मिळावा, यासाठीच्या समितीचा मी अध्यक्ष होतो. तांत्रिकदृष्टय़ा अजूनही मी या पदावर आहे. या समितीने तयार केलेला अहवाल 2013 मध्ये केंद्र सरकारला सादर केला गेला. केंद्र सरकारने त्याची अकादमीक चिकित्सा करण्यासाठी तो साहित्य अकादमी या नामवंत संस्थेकडे पाठविला. त्या संस्थेने नियुक्त केलेल्या देशातील भाषा शास्त्रज्ञांनी हा दावा अकादमीक अंगाने उचित असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे दिला. या गोष्टी वृत्तपत्रातून एक सामान्य नागरिक म्हणून मला माहित झाल्या आहेत. पण आज 2017 मध्येसुद्धा त्यास केंद्र सरकारची मान्यता का मिळालेली नाही? अडचणींविषयीच्या काही गोष्टी वृत्तपत्रांमधून छापून येत असतात. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, असा प्रश्न पडतो. पण महाराष्ट्र सरकार आणि त्याचे प्रमुख म्हणून आपण त्यासंबंधी काही अधिकृत निवेदन केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. आपण ते करावे, अशी माझी आपणास विनंती आहे.

 गेल्या 27 फेब्रुवारीला सालाबादप्रमाणे मला पेपरांमधून फोन आले, की बाबा, तुमच्या ‘अभिजात’ मागणीचे काय झाले? मी त्यांना म्हणालो, आम्हाला जे काम सोपविले गेले होते, ते आम्ही केले आहे. आता हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. कोणी आपणास विचारले की नाही, हे मला माहीत नाही. पण आपल्या भाषेसाठी ही बाब महत्वाची आहे, असे मला वाटते. प्रश्न मिळणाऱया पैसे वगैरेंचा नाही. मातृभाषेविषयी आत्मविश्वास गमावलेल्या आपल्या लोकांना थोडा धीर येण्यास त्यातून मदत होईल, असे वाटते. बाकी भाषेसाठी अनेक गोष्टी करता येतीलच. त्याविषयी माझ्या काही कल्पना आहेत. ते काम आपण ज्यांच्यावर सोपवाल, त्यांना मी त्याविषयी अवश्य सांगेन. आपण आणि आपल्या नेतृत्वाखाली आपले सर्वपक्षीय खासदार यांनी यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे. आपले प्रयत्न चालू असतीलच. पण ते मराठी लोकांना माहीत व्हावेत, असे वाटते. साहित्यसंस्था, विद्यापीठे, जागरूक नागरिक अशांच्या सह्यांचे निवेदन केंद्र सरकारकडे गेल्यास आपल्या प्रयत्नांना अधिक पाठबळ मिळेल असे वाटते. तसे प्रयत्न काही लोकांनी सुरु केले आहेत.. 
आपले अधिकृत निवेदन त्यास बळ देईल असे वाटते, असा विश्वासही पठारे यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.