|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्नेहलता चोरगेंच्या घरावर मध्यरात्री दगडफेक

स्नेहलता चोरगेंच्या घरावर मध्यरात्री दगडफेक 

वैभववाडी : जि. प. च्या माजी महिला व बालविकास सभापती तथा जि. प. सदस्या स्नेहलता चोरगे यांच्या वैभववाडी येथील राहत्या घरावर मध्यरात्री अज्ञाताने दगडफेक केली. या दगडफेकीत त्यांच्या कारचे नुकसान झाले. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत चोरगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून भाजपच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. गाडय़ा व घरांवर दगडफेक करणे हा भ्याडपणा आहे. हिंमत असेल तर समोरासमोर या, असा इशारा चोरगे यांच्यासह भाजप पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेत दिला. ही दगडफेक राजकीय वैमनस्यातून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चोरगे या यापूर्वी काँग्रेसमधून जि. प. वर निवडून गेल्या होत्या. त्यांनी महिला व बालविकास सभापती म्हणूनही काम केले आहे. सुमारे दोन महिन्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या जि. प., पं. स. निवडणुकीत त्यांनी आपल्या कोकिसरे जि. प. मतदारसंघातून भाजपचे सुधीर नकाशे व अक्षता डाफळे यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभापती निवडीतही त्या सक्रिय होत्या. या निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण रावराणे हे सभापती झाले. त्यांच्या विजयाची बाजारपेठेत भव्य रॅली काढण्यात आली. त्यातही त्या सहभागी झाल्या होत्या.

बुधवारी रात्री चोरगे या घरातील कामे आटोपून रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास झोपी गेल्या. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्या आवाजाने त्यांना जाग आली. मात्र, काहीतरी पडले असेल असा विचार करून पुन्हा झोपी गेल्या. सकाळी उठल्यावर त्यांनी पाहणी केली असता त्यांच्या वरील मजल्यावरील बेडरुमला लागून असलेल्या गॅलरीत दगड असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी खाली येऊन पाहणी केली असता घराच्या अंगणात उभी करून ठेवलेल्या महिंद्रा कंपनीच्या व्हेरिटो कारवर (एमएच- 09/सीएम-6551) दगड मारून कारची दर्शनी काच फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

                                   तक्रार दाखल

अज्ञाताने राजकीय वैमनस्यातून ही दगडफेक केल्याचे दिसत आहे. या घटनेची माहिती त्यांनी भाजप पदाधिकाऱयांना दिली. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱयांसह पोलीस  ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम 336, 427 नुसार गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या घटनेनंतर भाजप पदाधिकाऱयांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. गाडी आणि घरांवर दगड मारण्यापेक्षा हिंमत असेल तर आमच्यावर दगड मारा. आम्ही दगड व तुमची वाट पाहत आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

                        कारवाई करा, अन्यथा आंदोलन

पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते अतुल रावराणे यांनी जिल्हय़ात यापूर्वीही असे प्रकार झाले आहेत. शिवजयंतीच्या दिवशी एका महिलेवर हल्ला होणे हे नामर्दपणाचे आहे. या दगडफेकीमागे जी कोणी राजकीय शक्ती असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी रावराणे म्हणाले, चोरगे यांच्यामुळे त्यांच्या कोकिसरे जि. प. मतदारसंघात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. शिवाय तालुक्याचाही सभापती भाजपचा बसला. या सगळय़ाचा उद्रेक बुधवारी रात्री 10.30 वाजता चोरगे यांच्या घरावर दगडफेक करून करण्यात आला आहे. दगडफेक ही भ्याड कृती आहे. घरांवर व गाडय़ांवर दगडफेक करून वैभववाडीत शांतताभंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेदरम्यान बाजारपेठेत बसविण्यात आलेले सीसी टीव्ही कॅमेरे बंद झाले होते. याचाच अर्थ हा पूर्वनियोजित कट होता.

भाजपची ताकद वाढत आहे. भाजपकडे वाढत असलेला जनतेचा ओढा न रुचणाऱया समाजकंटकांनी हा भ्याडपणा केला आहे. जिल्हा पोलीस अधिकाऱयांनी लवकरात लवकर या घटनेचा छडा लावावा. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा रावराणे यांनी दिला आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी निवडणुकीत विरोधकांनी केलेले प्रतिदावे पाहता हा प्रकार राजकीय वैमनस्यातून झालेला आहे. कार्यकर्त्यांच्या घरावर, गाडय़ांवर दगडफेक करण्यापेक्षा आमच्यावर मारा. या घटनेतील हल्लेखोरांची माहिती मिळाली तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला.

      घाबरणार नाही-चोरगे

चौरगे यांनी, माझ्या घरावर व गाडीवर केलेला हल्ला हा विरोधकांचा भ्याडपणा असल्याचे म्हटले आहे. लपून दगड मारण्यापेक्षा हिंमत असेल तर समोरासमोर या. दोन देऊ किंवा दोन घेऊ, पण कोणाला घाबरणार नाही, असा इशारा दिला आहे. दरम्यान, या घटनेने तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

           ही दहशत कोणाची?

जिल्हय़ात यापूर्वी देवगड येथील बांबुळकर यांच्या गाडीचे टायर जाळण्यात आले होते. कणकवली येथे ऍड. उमेश सावंत यांच्या गाडय़ा जाळण्यात आल्या. कुडाळ येथील शोरुम जाळण्यात आले. आता वैभववाडीतील घटनेने हे प्रकार पुन्हा वाढीस लागले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान कणकवली येथील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून गाडीचे नुकसान करण्यात आले होते, याची आठवण रावराणे यांनी करून दिली.