|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » माकडताप पुण्यापर्यंत

माकडताप पुण्यापर्यंत 

बांदा : बांदा शहरातील सटमटवाडीसह या भागात फैलावलेल्या रुग्णांची संख्या आता 53 वर पोहोचली आहे. माकडताप आटोक्यात आणण्यासाठी शिमोगा येथील पथक शुक्रवारी सकाळी दाखल होत आहे. दरम्यान, पुणे येथेही माकडतापाचे दोन रुग्ण आढळले असून तेथील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला आहे. गाळेल येथील एका व्यक्तीने गोणी भरून नारळ पुण्याला नेले होते. त्यातून गोचिड तेथे पोहोचल्याने तेथे माकडतापाचा संसर्ग झाला आहे.
गाळेल, डिंगणे, निगुडे भागात आरोग्य विभागाने सर्व्हे हाती घेतला आहे. या भागात माकडतापाचे रुग्ण आढळल्याने हा सर्व्हे हाती घेतला आहे. काजू बागायतीत काम करणाऱया महिलांना माकडतापाची लागण झाल्याने या भागात रुग्ण आढळत आहेत.
आतापर्यंत 141 रुग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील 53 रुग्ण माकडतापाचे असल्याचे समोर आले आहे. बुधवारी चार रुग्णांची नोंद तर गुरुवारी पुष्पगुच्छासाठी पाने गोळा करणाऱया परजिल्हय़ातील राजकुमार राधेश्याम यादव या कामगाराला माकडतापाची लागण झाली आहे. तो बांदा येथे राहत आहे. राजकुमार याला ताप येत असल्याने 13 मार्चला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्याच्या रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह आला आहे. तो सध्या बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल आहे. त्याची तब्बेत सुधारत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांना विचारले असता आजच्या दिवसात मृत माकड मिळाला नसल्याचे सांगितले. तर बांदा सटमटवाडीसह गाळेल भागातील जंगलात मृत माकड सापडत असल्याने त्या भागातही निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेतल्याचे सांगितले.
बांदा पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव, पशूसंर्वधन उपायुक्त डॉ. पठाण, सहाय्यक डॉ. खानोलकर, पशूधन विकास अधिकारी डॉ. जाधव, जिल्हा पशूधन अधिकारी डॉ. देसाई यांच्या पथकाने गोचिडसाठी गोठे व अन्य भागात फवारणीचे काम हाती घेतले.
या पार्श्वभूमीवर माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी कर्नाटकातील शिमोगा येथील पथक बांद्यात दाखल होणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले होते. ते पथक उद्या किंवा परवा सकाळपर्यंत बांदा येथे दाखल होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.