|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘परिवर्तन’ प्रत्यक्षात उतरणार कधी?

‘परिवर्तन’ प्रत्यक्षात उतरणार कधी? 

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठय़ा अपेक्षेने लोकांनी परिवर्तन घडविले. त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून दिसणाऱया समस्यांचे निराकरण आपण व सर्व नगरसेवक मिळून कराल, अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. कोणतीही समस्या कायद्याचा धाक दाखवून सोडविण्यापेक्षा नैतिक आवाहनाने स्वतःपासून सुरुवात केल्यास त्याचे परिणाम आनंददायी असतात. त्यामुळे आपल्यासोबत आम्ही आहोत, आपण आमच्यासोबत असावेत ही अपेक्षा मालवणातील लोकहक्क संघर्ष समिती सिंधुदुर्ग यांनी व्यक्त केली आहे. या समितीने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेऊन शहराच्या मूलभूत प्रश्नांची यादीच सादर करीत परिवर्तन प्रत्यक्षात उतरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी चंद्रवदन कुडाळकर, चंद्रकांत केळुसकर, आत्माराम कुमठेकर, रमण वाईरकर, राजेश कुडाळकर उपस्थित हाते. या निवेदनात, शहरातील सांडपाणी प्रश्नावर स्वच्छतेच्या दृष्टीने व बऱयाच ठिकाणी उघडय़ावर सोडलेले पाणी हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जल, वायू व अन्न प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. हॉटेल्स, लॉजिंग, नागरी निवासी संकुले यांच्या सांडपाण्यामुळे मालवणवासीय त्रस्त आहेत. त्यामुळे सर्व जनतेने सांडपाणी बंदिस्त टाकीमध्ये सोडण्याबाबत आग्रह धरावा. नाहीच झाले, तर कायदेशीर कारवाई करणे उचित आहे.

कचरा समस्या गंभीर

कचऱयावर प्रक्रिया करण्याची मानसिकता जनतेत निर्माण करणे गरजेचे आहे. कुजणाऱया कचऱयापासून खतनिर्मिती, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या कचऱयावर प्रकिया करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयोग राबविणे आवश्यक आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कचरा जाळणे बंद करणे आवश्यक आहे. 50 मिमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या पर्यायापेक्षा ज्युट व कापडी पिशव्या जनतेने वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. डासांमुळे मालवणात हत्तीरोग, डेंग्यू, हिवताप अशा आजाराचा प्रादूर्भाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. स्वच्छतागृहांची टाकी म्हणजे डास निर्मितीचे केंद्र असल्याने डास प्रतिबंधासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, सामान्य नागरिकांना किमान दरात शासकीय रुग्णालयात उपचार मिळणे आवश्यक आहे. परंतु गंभीर अपघातात प्राथमिक उपचारही मिळणे सध्या दुरापास्त झाले आहे. मालवण नगरपालिकेने रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करणे गरजेचे आहे. येथे वाहतुकीची कोंडी जाणवते. सर्व ठिकाणी दिशादर्शक बसवून एकेरी मार्गाचा आग्रह धरण्यासाठी नियमांची आखणी करून वाहतुकीला शिस्तबद्धता येईल. अनेक ठिकाणी रस्त्यांचा वापर वाहनतळ म्हणून केला जात असल्याने वाहतुकीस अडथळा होतो. तहसील कार्यालय मेढा ते देऊळवाडा हा रस्ता दुपद्रीकरणाचा प्रस्ताव नगरपालिकेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देणे आवश्यक आहे. देऊळवाडा ते तहसील कार्यालय आणि बाजारपेठेसह अन्य ठिकाणी दुकाने व घरे किंवा पुंपणांचे रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा  होऊन रस्त्यावर चालणाऱयांचा अधिकार गमावला गेला आहे. त्यामुळे पदपथाची निर्मिती आवश्यक आहे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

अनधिकृत विक्रेते, हातगाडय़ांचा प्रश्नही महत्वाचा

भाजी, फळ, खाद्यपदार्थ विक्रेते हे बाजारपेठेतील गर्दीच्या रस्त्यावर हातगाडय़ा लावून जागा अडवतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यांना नगरपरिषदेकडील पर्यायी योग्य जागा दिल्यास नगरपरिषदेच्या उत्पादनातही वाढ होईल. शहरातील वृक्षसंपदा व पर्यावरण हे मानवी विकासाबरोबर टिकविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत हा आग्रह आहे. वीज वितरण कंपनीने खांब उभारताना वाहतुकीस अडथळा येणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत. भूमिगत सांडपाणी व्यवस्थेसाठी रस्त्यांची खोदाई गेली चार वर्षे सुरू असल्याने खड्डेमय रस्ते व धूळीमुळे लोक हतबल झाले होते. ही योजना परिपूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करून योजना दर्जेदारपणे पूर्ण करावी. शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा करून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करावा. पालिकेने आवश्यकता वाटल्यास कंत्राटी कामगार नेमून दिवाबत्तीची सोय करावी, अशा मागण्या केल्या आहेत.