|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘जिओ’वर मालवणात वरदहस्त

‘जिओ’वर मालवणात वरदहस्त 

मालवण : कुडाळ शहरात रिलायन्स जिओ कंपनीने रस्त्याच्या बाजूने भूमिगत ओएफसी टाकण्यासाठी नगरपंचायतीकडे परवानगी मागून नुकसान भरपाई म्हणून 11 लाख 55 हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. मात्र, मालवण शहरात बिनधास्तपणे जिओ केबल टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेची साधी परवानगीही घेतलेली नाही. याबाबत नगरसेवकांनी आक्रमकपणे आवाज उठविल्यानंतर फक्त पत्रव्यवहारापुढे काहीही कार्यवाही न झाल्याने पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या भूमिकेवर सोशल मीडियावर अनेक किंतू-परंतु उपस्थित होत आहेत. त्यामुळे पुन्हा विरोधकांना सत्ताधाऱयांना कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे काँग्रेस ग्राहक सेलचे तालुकाध्यक्ष रमण वाईरकर यांनी मालवण नगरपालिकेकडून कोणतेही शुल्क न आकारता रिलायन्स जिओला केबल टाकण्याची परवानगी दिली कशी? कुडाळ आणि मालवणचे सत्ताधारी वेगळे आहेत म्हणून काय? असा सवाल केला आहे. वाईरकर यांच्या सोशल मीडियावरील प्रश्नावर शहरात चर्चा रंगली आहे.

फेबुवारीत मालवण शहरात रिलायन्स जिओ कंपनीची केबल शहरातील रस्त्याच्या साईडने टाकण्यात आली. ही केबल टाकण्याचे काम भरड परिसरात नागरिकांनी रोखले. त्यावेळी पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी कामाच्या ठिकाणी उभे राहून काम करवून घेऊ लागले. रात्रीचे हे काम सुरू करण्यात येत असे. याची माहिती मिळताच भाजप नगरसेविका सौ. पूजा करलकर यांनी पालिकेच्या अधिकाऱयांना घेऊन कंपनीने पालिकेच्या जागेत टाकलेल्या साहित्यावर आक्षेप घेतला. त्यावर ठेकेदाराच्या कर्मचाऱयांनी पालिकेच्या अधिकाऱयांना थेट एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱयाला फोन लावून दिला होता. त्यामुळे करलकर यांनी आक्रमकपणे पालिका प्रशासनाला या कामाची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. त्यावर फक्त कंपनीकडे पत्रव्यवहार करण्याची कार्यवाही पालिकेने केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

लोकप्रतिनिधींच्या आक्षेपानंतरही कारवाई नाही

 पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनीही या केबलच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत कारवाईची मागणी केली होती.  माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत यांनी रस्ता खोदाईवर नाराजी व्यक्त केली होती. नगरसेवक यतीन खोत यांनीही आक्रमकपणे भरड परिसरातील नागरिकांसमवेत ठेकेदाराच्या रस्ता खोदण्यावर आक्षेप नोंदविला होता. तरीही रिलायन्स जिओ कंपनीकडून पालिकेशी नुकसान भरपाईबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही.

सोशल मीडियावरून सत्ताधाऱयांवर टीका

कुडाळ नगरपंचायतीच्या बैठकीचे वृत्त आज वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होताच मालवण शहरात पालिकेतील सत्ताधाऱयांकडून जिओला आशीर्वाद देण्यात आला आहे का? याचीच चर्चा रंगली आहे. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारीही या कामावर असल्याची चर्चा आहे. महिना होऊनही कंपनीकडून दंडात्मक कारवाईची रक्कम भरणाबाबतही कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.