|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकिस्तान-चीन संयुक्तरित्या क्षेपणास्त्रs बनवणार

पाकिस्तान-चीन संयुक्तरित्या क्षेपणास्त्रs बनवणार 

दोन्ही देशांमध्ये संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षऱया : भारताच्या अग्नी-5 ला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पाकिस्तान आणि चीनने संयुक्तरित्या क्षेपणास्त्रs तयार करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. भारताने गतवर्षी अग्नी-5 या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर चीनने उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र भारताच्या या खेळीला शह देण्यासाठी पाकिस्तानशी हातमिळवणी करण्याचा आणि त्यांना क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुरवण्याचा चीनने करार केला आहे.

या करारानुसार चीन पाकिस्तानशी संयुक्तरित्या बॅलेस्टिक, क्रूज, विमानविरोधी आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रs बनवण्यासाठी मदत करणार आहे. याबाबतच्या करारावर चीन आणि पाकिस्तानने नुकतीच स्वाक्षरी केली आहे. केवळ भारताला अडचणीत आणण्याच्या दृष्टीनेच हा करार करण्यात आल्याचे मानले जात आहे. संरक्षण क्षेत्रातील या करारानुसार दोन्ही देश मिळून रणगाडे, क्षेपणास्त्रs, लढाऊ विमाने तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

चीनमधील ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोन्ही देश विमानविरोधी एफसी-1 हे क्षेपणास्त्र विकसीत करणार आहेत. हलके आणि बहुउद्देशीय असे क्षेपणास्त्र असून त्याची मोठय़ा प्रमाणात निर्मिती करण्यात येणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. याशिवाय दहशतवादाविरोधातही कार्य करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले आहे. पूर्व तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट या संघटनेविरोधात कडक धोरण स्वीकारण्याचाही मुद्दा यामध्ये आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा आणि चीनच्या लालसेनेचे अग्रणी अधिकारी फांग फेंगशुई यांच्यामध्ये याबाबत गुरुवारी दीर्घ बैठक झाल्यानंतर या बाबी उघड झाल्या आहेत. बीजिंगमध्येच ही बैठक घेण्यात आली आहे. बाजवा सध्या चीन दौऱयावर असून चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला सुरक्षा पुरवण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे.

पाकिस्तानने या सीपीईसीच्या सुरक्षेसाठी 15 हजारहून अधिक सैन्यबळ तैनात केले आहे. चीनमधील पाकिस्तानचे राजदूत मसूद खालिद यांनीही पाकिस्तानी नौदलाने ग्वादर बंदराच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले होते. ग्वादर बंदराचा पाकिस्तान चीनच्या सहकार्याने विकास करत आहे. चीनसाठी ग्वादर बंदर, सीपीईसी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताचे वाढते महत्त्वही चीनला बोचत असल्याने पाकिस्तानला मुक्तहस्ते मदत करण्याचे धोरण उघडपणे दिसून येऊ लागले आहे.

तालिबान, अल-कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांचा पाकिस्तानला धोका असल्याचे चीनचे मत आहे. या संघटनांचा चीनच्या प्रकल्पांनाही धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून दोन्ही देशांनी या संघटनांच्या निमित्ताने दहशतवादविरोधात लढण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचेही ठरवले असल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे.

Related posts: