|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सज्जनगडावर सेल्फी घेताना एकाचा मृत्यू

सज्जनगडावर सेल्फी घेताना एकाचा मृत्यू 

सातारा :

 सातारा येथे अंबवडे बुद्रुक येथून दुचाकीवर फिरण्यासाठी आलेले नवविवाहित दाम्पत्याला सज्जनगडाच्या कडय़ावर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. पती-पत्नी दोघेही कडय़ावर उभे राहून पती धनंजय यशवंत जाधव (वय 32, रा. अंबवडे बुद्रुक) हे सेल्फी घेत असतानाच त्यांचा पाय घसरला. तेवढय़ात पत्नीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांचा हात निसटला व ते सुमारे 300 फूट खोल दरीत पडले. यात डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, अंबवडे बुद्रुक (ता. सातारा) येथील धनंजय यशवंत जाधव यांचा विवाह निलम यांच्यासोबत चार महिन्यांपूर्वी झाला होता. शुक्रवारी हे दाम्पत्य सातारा येथे दुचाकीवरुन फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान हे दाम्पत्य दुचाकीवरुन सज्जनगड येथे फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी सूर्य मावळताना सज्जनगडावरुन विलोभणीय दृश्य दिसल्यामुळे त्यांना कडय़ावरून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी घेताना धनंजय जाधव याचा पाय कडय़ावरुन घसरला. त्यावेळी पत्नी निलम यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हात निसटल्याने ते 300 फूट खोल दरीत पडले. यात त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.  रात्री उशिरा पोलिसांनी त्यांचा मृतदेह दरीतून वर काढला. अंबवडे बुद्रुक गावावर शोककळा पसरली. धनंजयच्या मृत्यूने त्याच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात यांची नोंद झाली आहे.