|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आयरिश युवतीचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द

आयरिश युवतीचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द 

प्रतिनिधी/ मडगाव

देवाबाग-काणकोण येथे आयरिश युवती डॅनियला मॅक्लून हिचा बलात्कार करून खून केल्याच्या घटनेला चार दिवस पूर्ण झाले. काल सकाळी तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तिचे नातेवाईक शुक्रवारी गोव्यात पोहचले होते. या खून प्रकरणाने बरीच खळबळ माजली त्याचबरोबर गोव्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड बदनामी झाली. या पूर्वी गोव्यात स्कार्लेट प्रकरण गाजले होते.

अल्प काळाची सुट्टी घालविण्यासाठी डॅनियला मॅक्लून ही 28 फेब्रुवारी रोजी गोव्यात आली होती. अगोदर उत्तर गोव्यात तिचा मुक्काम होता व नंतर दक्षिण गोव्यात पाळोळे समुद्र किनाऱयावर होळी साजरी करण्यासाठी आली होती. यावेळी तिची विकट भगत याच्याशी गाठभेट झाली. विकट भगतने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लैंगिक प्रकरणाची वाच्यता झाल्यास पोलिसांकडून अटक होईल, या भितीने त्याने डॅनियल मॅक्लूनचा बियरच्या बाटलीने खून केला. तिच्या डोक्यात त्याने खोलवर बियरची बाटली टोचली तसेच तिचा चेहरा देखील विद्रूप केला होता.

मात्र, या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपास लावताना विकट भगत या युवकाला अटक केली. त्याने खून केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. खून प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास लावण्यासाठी काल आरोपीची डीएनऐ चाचणी देखील घेतली आहे.

संशयित आरोपी विकट भगत व डॅनियल मॅक्लून यांची गेल्या वर्षीच पाळोळे समुद्रकिनाऱयावर ओळख झाली होती. डॅनियल मॅक्लून ही विकट भगतला आपला भाऊच मानत होती. दोघांची ही मैत्री फेसबुक व सोशल मिडियाच्या माध्यमातून कायम राहिली. डॅनियल जेव्हा उत्तर गोव्यात होती, तेव्हा तिने आपण दक्षिण गोव्यात आपल्या मित्रासोबत होळी साजरी करण्यासाठी जाणार असल्याची कल्पना आपल्या मित्राला दिली होती. त्या प्रमाणे ती काणकोणला आली व तिने वर्षभरापूर्वीचा मित्र विकट भगतची भेट घेतली. हीच भेट तिच्यासाठी जीवघेणी ठरली.

काणकोणचे पोलीस या प्रकरणाचे भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी कार्यरत आहे. आत्ता पर्यंत खून करण्यासाठी वापरलेली बियरची बाटली, डॅनियलचे कपडे, आरोपीची स्कुटर, सीसीटीव्ही फुटेज, शॅक्स मालकांच्या जबान्या नोंद केल्या आहेत. शिवाय शवचिकित्सवेळी व्हिसेरा देखील जतन केला आहे.

विकट भगतची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने, त्याची काही जुनी प्रकरणे देखील नव्याने खोलली जाणार आहेत. पोलिस तपासात कोणतीच त्रूटी राहू नये, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.