|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वेळ्ळी चर्च हल्लाप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बोलणी करणार

वेळ्ळी चर्च हल्लाप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बोलणी करणार 

प्रतिनिधी / मडगाव

वेळ्ळी येथील चर्चच्या आवारात झालेल्या हल्ला प्रकरणातील संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आलेला असून सदर कलम गाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत याकरिता आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी बोलणी करणार आहे, असे मंत्री व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

वेळ्ळी चर्चचे तत्कालीन फादर रूमान गोन्साल्वीस हे या हल्ला प्रकरणातील एक संशयित आरोपी असून त्यांनी या प्रकरणातील अन्य काही संशयित आरोपी व गोवा फॉरवर्डतर्फे वेळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढविलेले उमेदवार अँथनी उर्फ बाबूश रॉड्रिग्स यांच्यासह शनिवारी दुपारी मंत्री सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. या खटल्यातील खुनाच्या प्रयत्नाचा आरोप वगळावा ही या निवेदनातील मुख्य मागणी आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिल्यास भाजप सरकारने मागील कार्यकाळात आधी सदर खटलाच मागे घेण्याचे ठरविले होते. नंतर प्रथम श्रेणी न्यायाधीशांनी या खटल्यातील खुनाच्या प्रयत्नाचा आरोप वगळला होता. मात्र पार्सेकर सरकारने या निवाडय़ाला आव्हान दिले होते. आता नवीन सरकार सत्तेवर आलेले असल्याने संशयितांनी सरदेसाई यांच्यामार्फत खुनाच्या प्रयत्नाचा आरोप वगळावा यासाठी पर्रीकर सरकारला साकडे घातले आहे. सदर कलमामुळे संशयितांना कामासाठी परदेशात जाण्यावर बंधने येतात हे यावेळी नजरेस आणून देण्यात आले. त्यानंतर सरदेसाई यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी त्वरित भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी पर्रीकर यांनी ते कलम मागे घेण्यास हिरवा कंदील दाखविला असल्याचे सरदेसाई यांनी भेट घेतलेल्यांना सांगितले.

‘सरदेसाईंना दोष कशाला ?’

दरम्यान, वरील पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी गोवा फॉरवर्ड व मंत्री सरदेसाई यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावताना त्यांचा चांगलाच समाचार घेतला. काँगेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी ट्विट करून गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना स्थानिक नेत्यामुळे खो बसल्याचे म्हटले आहे. असे असताना फालेरो हे आमच्या पक्षाला आणि सरदेसाई यांना कसे काय दोष देऊ शकतात, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. काँग्रेसला आपले आमदार शपथ घेतल्यानंतर दोन तासही सांभाळून ठेवता आले नाहीत, असा टोला त्यांनी विश्वजित राणे यांच्या राजीनाम्याकडे अंगुलीनिर्देश करताना हाणला.

‘मडगाव पालिका क्षेत्राच्या विकासास प्राधान्य’

सरदेसाई यांनी याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मडगाव व फातोर्डा मतदारसंघात येणाऱया मडगाव पालिका क्षेत्राच्या विकासाला आपले प्राधान्य राहणार असल्याचे सांगितले. सोनसडो कचरा प्रकल्प, पार्किंग प्रकल्प, आर्लें ते शिरवडे भू – गटार वाहिनी, जिल्हा इस्पितळ प्रकल्प, नवीन बसस्थानक ही कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.