|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विकासकामाचा दिखावा, नागरिक वेठीस

विकासकामाचा दिखावा, नागरिक वेठीस 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात येत असून शनिवारपासून कॉलेजरोडच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र आवश्यक असलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष करून गुळगुळीत असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच डांबरीकरणाचे काम रात्रीच्यावेळी करण्याऐवजी दिवसा करून वाहनधारकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याबद्दल महापालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहर विकासासाठी मंजूर झालेल्या चौथ्या शंभर कोटी अनुदानामधून कॉलेज रोडच्या रुंदीकरणासाठी 84 लाखाचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ रविवारी महापौर संज्योत बांदेकर, माजी महापौर सरिता पाटील आणि आमदार फिरोज सेठ यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी मशीनचे पूजन करून डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे.

धर्मवीर संभाजी चौक ते राणी चन्नम्मा चौकपर्यंतच्या कॉलेज रोडचे डांबरीकरण या निधीअंतर्गत करण्यात येणार आहे. शनिवारी बाजारादिवशीच शहरातील वाहतूक वळवून रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तयारी करण्यात आली होती. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कॉलेज रोड हा शहराच्या बाजारपेठेत येण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने हा रस्ताच पूर्ण बंद करण्यात आला होता. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम रविवारी सकाळपासून हाती घेण्यात आले असून गुळगुळीत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असल्याचे पाहून वाहनधारक आणि नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

महापालिकेच्या कारभाराबाबत संताप

बाजारपेठ आणि उपनगर भागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मात्र सध्या सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असल्याचे पाहून महापालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला. आवश्यक असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली असता, निधी नसल्याचे कारण सांगण्यात येते. पण गुळगुळीत रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेकडे निधी असा उपलब्ध झाला असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

चौथ्यांदा मंजूर झालेल्या शंभर कोटी अनुदानामधून 85 कोटीची विकासकामे उत्तर विभागात राबविण्यात येणार असून अनेक गुळगुळीत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

या रस्ता वर्दळीचा असल्याने डांबरीकरणाचे काम रात्रीच्यावेळी करण्याची आवश्यकता आहे. तसेच मुख्य रस्त्यांवर पथदीप सुविधा असल्याने रात्रीच्यावेळी डांबरीकरण करण्यास कोणतीच अडचण नव्हती, पण नागरिक आणि वाहनधारकांना वेठीस धरून रस्त्याचे काम करण्यात आले. शहराचा विकास करीत असल्याचा दिखावा करण्यासाठी भरदिवसा डांबरीकरण करण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.