|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपा बैठकीच्या तारखेवरून नगरसेवकांत वादंग

मनपा बैठकीच्या तारखेवरून नगरसेवकांत वादंग 

प्रतिनिधी / बेळगाव

सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शहरातील विकासकामे राबविणार असल्याचे महापौरांनी सांगितले आहे. मात्र बैठकीची तारीख महापौरांनी न विचारता ठरविली असल्याचा ठपका ठेवून विरेधी गटनेत्याने महापौर कक्षात माजी महापौर आणि सत्ताधारी गटनेत्यांशी हुज्जत घातली. बैठकीची तारीख निश्चित करण्याचा निर्णय महापौरांना आहे. पण सर्व निर्णय आपल्याला विचारून घ्यावेत, असा अट्टहास विरोधी गटनेत्यांनी चालविला आहे.

नवनिर्वाचित महापौर-उपमहापौरांची पहिली बैठक आयोजित करण्यासाठी महापौरांनी कौन्सिल विभागाला पत्र दिले आहे. दि. 28 रोजी बैठक आयोजित करण्याची सूचना केली आहे. मात्र गुढीपाडवा असल्याने बैठकीबाबत अनिश्चितता आहे. बैठकीची तारीख न विचारता ठरविण्यात आली असल्याच्या मुद्यावरून प्रारंभी उपमहापौर आणि आता विरोधी गटनेत्यांनी वादग्रस्त भूमिका घेतली आहे.

बैठक घेण्याची सूचना केली असली तरी 58 नगरसेवकांशी चर्चा करून अजेंडय़ावरील विषय निश्चित करण्यात येणार असल्याचे महापौर संज्येत बांदेकर यांनी सागितले होते. तसेच 58 नगरसेवकांची बैठक सोमवारी महापौर कक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण याकडे दुर्लक्ष करून विरोधी गटाला विश्वासात न घेता तारीख का ठरविण्यात आली अशी भूमिका विरोधी गटतेने रवि धोत्रे यांनी घेवून महापौरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी महापौर किरण सायनाक यांच्याशी वाद घातला.

बैठकीची तारीख ठरविण्याचा अधिकार महापौरांना आहे असे सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी हा वाद सुरू असताना सांगण्याचा प्रयत्न केला असता, विरोधी गटनेत्याने पंढरी परब यांच्याशीही वाद घातला. यामुळे हा वाद वाढत विकासकामांमधून मिळणाऱया कमिशन वाटणीच्या मुद्यावर जावून पोहचला. यामुळे माजी महापौर आणि विरोधी गटनेत्यामध्ये जोरदार वादावादी झाली. याप्रसंगी काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

        वादामागचे कारण वेगळेच

 वादामागचे कारण वेगळेच असल्याची चर्चा आहे. मागासवर्गियाच्या 24.10 टक्के अनुदानाअंतर्गत स्वयंरोजगार योजनेतील बोगस लाभार्थी निवडप्रकरण उघडकीस आल्याने याबाबतचा राग रवि धोत्रे यांनी माजी महापौरांवर काढला आहे. यामुळेच हा वाद झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. स्वयंरोजगार योजनेतील लाभार्थीची चौकशी करण्यात येत आहे. यामुळे या प्रकरणाची धास्ती विरोधी गटातील काही नगरसेवकांनी घेतली आहे. यामुळेच हे प्रकरण झाकण्यासाठी दबाव घालण्यासाठी बैठकीच्या मुद्यावरून वाद घालण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा नगरसेवक करीत आहेत.