|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष

तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष 

प्रतिनिधी / बेळगाव

   दुष्काळ परिस्थितीबाबत सरकार गंभीर असून, समस्या निवारण्यासाठी भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र बेळगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे जाणुनबुजून दुर्लक्ष होत असून, येथील लोकप्रतिनिधींना याबाबत समस्या मांडण्यासही देण्यात येत नाही, जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून झाल्यानंतर येथील सुवर्णसौधमध्ये दुष्काळ निवारण आढावा बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

 बैठकीला तालुक्यातील जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत सदस्यांनाही बोलावण्यात आले होते. मात्र एकाही सदस्याला आपल्या मतदार संघातील समस्यांबाबत बोलण्यास देण्यात आले नाही. यामुळे सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. अधिकारी वर्गाने नेहमीप्रमाणे दुष्काळी परिस्थितीची तीव्रता आपल्या भाषेत सांगितली आणि मंत्री महोदयांनी दुष्काळ निवारण्यासाठी सरकार गंभीर असून, कोठेही अनुदानाची कमतरता भासू देणार नाही, असे नेहमीचे तुणतुणे वाजविले. बैठकीस अवजड उद्योगमंत्री व दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे, जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील, जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आदी उपस्थित होते.

पाणी समस्या न सोडविल्यास आंदोलन-म. ए. समितीचा इशारा

  बैठकीस बोलावण्यात आल्याने म. ए. समितीच्या जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, तालुका पंचायत सदस्य मथुरा तेरसे, निरा काकतकर, लक्ष्मी सुळगेकर, लक्ष्मी मेत्री, कल्पना पालेकर, नारायण कदम, रावजी पाटील आदी उपस्थित राहिले, तालुक्यातील तीव्र पाणी टंचाईकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणत्याच सदस्याला बोलण्याची संधी  देण्यात आली नाही, एकीकडे सरकार दुष्काळ परिस्थिती निवारण्यासाठी निधीची कमतरता नसल्याचे सांगत असताना अधिकारीवर्ग अनुदान नसल्याचे सांगत आहेत. तसेच बेळगाव तालुक्यातील पाणी समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.  प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध करत तालुक्यातील म. ए. समितीच्या लोकप्रतिनिधीनी तालुक्यातील पाण्याची समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देत या मागणीचे निवासी जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांच्याकडे निवेदन सादर केले.

शासनाने कायमच होत झटकले

 जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाई गंभीर बनली असूनही प्रशासनाने याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केल्याचे सांगितले. तालुक्यातील पाणी समस्याबाबत अनेकवेळा निवेदने दिली तरी अधिकारी वर्गाने नेहमीच अनुदानाची कमतरता असल्याचे सांगून हात झटकले आहेत. दुष्काळ निवारण आढावा बैठकीत उपस्थित राहण्याचे सांगण्यात आल्याने  तालुक्यातील म. ए. समितीच्या जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत सदस्यांनी बैठकीस उपस्थिती दर्शविली होती. परंतु या बैठकीत सदस्य आपल्या मतदार संघातील समस्या मांडतील, याचा धसका घेऊन अधिकारी वर्गाने सदस्यांना बोलण्याची संधी दिली नाही, लोकप्रतिनिधीना आपल्या मतदार संघातील समस्या मांडण्याची संधीही देण्यात येत नसल्याबद्दल सरस्वती पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी नाराजी व्यक्त करुन निवेदन दिले.