|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धाडसी बहिणीकडून 3 महिन्याच्या भावाला जीवदान

धाडसी बहिणीकडून 3 महिन्याच्या भावाला जीवदान 

वार्ताहर/ अथणी

घराला लागलेल्या आगीतून आपल्या 3 महिन्याच्या भावाला वाचविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला सुखरुप बाहेर काढल्याची घटना 19 रोजी दुपारी 1 वाजता आजूर (ता. अथणी) घडली. या घटनेत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे. सुवर्णा हडपद असे बहिणीचे नाव आहे. या घटनेत सुवर्णा किरकोळ जखमी झाली आहे. असे जरी असले तरी भावाच्या पेमापोटी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱया 13 वर्षीय धाडसी बहिणीचे कौतुक होत आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी, हडपद हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती व्यवसाय करून करतात. या कुटुंबात सात सदस्य आहेत. त्यात तीन मुलांचा समावेश आहे. सुवर्णा त्या मुलांमध्ये मोठी असून एक लहान बहीण व एक तीन महिन्याचा भाऊ हे रविवारी घरीच होते. बाकीचे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. तर सुवर्णा पाणी आणण्यासाठी दुपारी बाहेर गेली होती. त्यावेळी अचानक घराला आग लागल्याचे तिला दिसले. त्यावेळी तिने आरडाओरड करुनपण कोणीच मदतीला आले नाही. अखेर वाढत जाणारी आग पाहून तिने स्वतः धाडस करत घरातील पाळण्यात झोपलेल्या आपल्या तीन महिन्याच्या भावाला वाचविण्यासाठी घरात प्रवेश केला.

19npn13

आगीत घरातील साहित्य जळत होते. त्याची पर्वा न करता सुवर्णाने पाळण्यात असलेल्या भावाला घेतले. त्यानंतर बाहेर पडताना दारात बांधलेल्या जनावरांच्या दोऱयाही सोडल्या. त्या प्रकारात तिला किरकोळ भाजले आहे. पण त्याही पेक्षा महत्त्वाचे भावाला व जनावरांना जीवदान दिल्याचे सर्वात मोठे समाधान वाटत असल्याचे तिने सांगितले.

आगीमुळे हवेत धुराचे लोळ दिसू लागल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आगीने रौद्ररुप धारण केल्याने अखेर अथणीच्या अग्नीशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दलाच्या कर्मचाऱयांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत घरातील रोख दहा हजार रुपये, दोन पोती धान्य, अर्धा तोळे सोने व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. सदर घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच सुवर्णाच्या धाडसी कृत्याचे कौतुक करण्यात येत आहे. तिच्या या धाडसामुळे जीवितहानी टळली आहे.