|Thursday, July 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शैक्षणिक प्रगतीत सिंधुदुर्ग अव्वलशैक्षणिक प्रगतीत सिंधुदुर्ग अव्वल 

सिंधुदुर्गनगरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शासनाच्या विद्या प्राधिकरण पुणे या शिखर संस्थेमार्फत करण्यात आलेल्या दुसरी ते आठवीच्या शैक्षणिक प्रगत चाचणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ाने संपूर्ण महाराष्ट्रात बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. पायाभूत व संकलित चाचणीमध्ये भाषा व गणित या दोन्ही विषयात सिंधुदुर्गने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. एवढेच नव्हे तर राज्यात उच्चतम गुणवत्ता प्राप्त 20 अव्वल तालुक्यांची निवड करण्यात आली. त्यामध्येही सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सात तालुके अव्वल ठरले आहेत, अशी माहिती जि. प. शिक्षण सभापती आत्माराम पालेकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांनी सोमवारी दिली.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शासनाने विद्या प्राधिकरण या शिखर संस्थेची नेमणूक करून सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या मान्यताप्राप्त शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करून वर्षभरात तीन वेळा शैक्षणिक प्रगत चाचणी, पायाभूत चाचणी व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील संकलित मूल्यमापनाच्या दोन चाचण्या घेण्यात आली. त्याचा निकाल विद्या प्राधिकरणने जाहीर केला आहे.

विद्या प्राधिकरणने जाहीर केलेल्या निकालानुसार भाषा विषयात पायाभूत चाचणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ाने सर्वाधिक 82.85 टक्के गुण मिळवले. भाषा विषयाच्या संकलित चाचणीमध्येही 82.55 टक्के गुण मिळवले व संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे गणित विषयामध्येही पायाभूत चाचणीमध्ये 83.66 टक्के गुण, गणित विषयाच्या संकलित चाचणीमध्ये 80.15 टक्के गुण मिळवून राज्यात भाषा व गणित या दोन्ही विषयात सिंधुदुर्ग जिल्हय़ाने प्रथम क्रमांक पटकावत सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगत आसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध पेले आहे.

पायाभूत चाचणी व संकलित चाचणीमध्ये राज्यात अव्वल ठरलेल्या 20 तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्येही सिंधुदुर्ग जिल्हय़ातील आठपैकी देवगड तालुका वगळता इतर सात तालुके राज्यात अव्वल ठरले आहेत. सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुका 85.61 टक्के गुण मिळवून राज्यात अव्वल ठरला आहे. तसेच सावंतवाडी 84.85 टक्के गुण, कणकवली 84.13 टक्के गुण, मालवण 84.03 टक्के गुण, दोडामार्ग 83.14 टक्के गुण, कुडाळ 83.05 टक्के गुण, वेंगुर्ला 83.36 टक्के गुण मिळवले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, कोणत्याही सुविधा नसतानाही मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद असल्याचे सांगत यापुढेही त्यात सातत्य ठेवण्यासाठी प्रयत्न करू असे शिक्षण सभापती पालेकर व शिक्षणाधिकारी गणबावले यांनी सांगितले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!