|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीयाला वाचविणाऱया ग्रिलेटचा होणार सन्मान

भारतीयाला वाचविणाऱया ग्रिलेटचा होणार सन्मान 

अमेरिकेतील भारतीय समुदायाचा पुढाकार

वृत्तसंस्था/ ह्यूस्टन

22 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या कन्सास येथील एका बारमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीयाचा जीव वाचविणारा अमेरिकेचा नागरिक इयान ग्रिलेटला  सन्मानित करण्याचा निर्णय तेथील भारतीय समुदायाने घेतला आहे. कन्सासच्या गोळीबारात श्रीनिवास कुचीभोतला यांना जीव गमवावा लागला होता. तर आलोक मदासानी यांना ग्रिलेटने वाचविले होते.

कन्सासच्या ओलाथे भागातील एका बारमध्ये अमेरिकेच्या नौदलाचा माजी सैनिक असणाऱया व्यक्तीने भारतीयांवर गोळीबार केला होता. या गोळीबारावेळी ग्रिलेट यांनी हल्लेखोराला रोखल्याने आलोक यांचा जीव वाचू शकला. हल्ल्यात ग्रिलेट हे देखील जखमी झाले होते.

ग्रिलेट हे एक खरे अमेरिकन हीरो आहेत. 25 मार्च रोजी त्यांचा सन्मान केला जाईल असे इंडियन हाउस गालाने म्हटले. तर ग्रिलेट यांनी सर्वांच्या प्राथनेशिवाय सर्वकाही ठीक झाले नसते, मी 25 मार्च रोजीच्या कार्यक्रमात भाग घेईल असे वक्तव्य केले. दरवर्षी ह्यूस्टन येथे निधी जमविण्यासाठी भारतीय समुदायाकडून इंडियन गाला आयोजित केला जातो. यात  अनेक कार्यक्रम असतात. आम्ही ग्रिलेट यांचा सन्मान करून स्वतःला भाग्यशाली मानू. ह्यूस्टनच्या सर्व लोकांना आमंत्रित केल्याचे इंडियन गालाचे संचालक जितेन अग्रवाल यांनी सांगितले. कार्यक्रमात भारतीय राजदूत नवतेज सरना, भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत डेव्हिड मूलफोर्ड, ओबामांच्या माजी सहाय्यक सचिव निशा बिस्वाल देखील सामील होतील.