|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पुढील महिन्यापासून रेल्वेप्रवास मनोरंजक

पुढील महिन्यापासून रेल्वेप्रवास मनोरंजक 

एप्रिलपासून नवी सेवा सुरू : कन्टेंट ऑन डिमांडसाठी निविदा, उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील महिन्यापासून रेल्वेप्रवासादरम्यान टीव्ही मालिका, चित्रपट, छोटय़ा चित्रफिती, मुलांचे कार्यक्रम, आध्यात्मिक कार्यक्रम, चित्रपटगीते आणि ई-वृत्तपत्रे, गेम, शैक्षणिक सामग्री इत्यादींची मागणी प्रवाशांना करता येणार आहे. प्रवासभाडय़ाशिवाय उत्पन्न वाढविण्याच्य प्रयत्नात असणारे रेल्वे मंत्रालय प्रवासादरम्यान किंवा रेल्वेस्थानकांवर प्रवाशांच्या मागणीनुसार मनोरंजन सामग्री उपलब्ध करण्याच्या दिशेने निर्णय घेत आहे.

मंत्रालयाने कन्टेंट ऑन डिमांड (सीओडी) आणि रेलरेडिओ सेवा उपलब्ध करविण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. एप्रिलपासून ही सेवा सुरू होईल अशी आशा मंत्रालयाला आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या एका अहवालानुसार रेल्वेगाडी आणि स्थानकांवर सीओडीद्वारे रेल्वेचा एकूण मनोरंजन बाजार पुढील 3 वर्षांमध्ये 2277 कोटी रुपयांमध्ये पोहोचू शकतो. यात रेडिओ, ऑडिओ, डिजिटल संगीत आणि डिजिटल गेमिंग सामील आहे. कन्टेंटचा मालकी हक्क बाळगणाऱया कंपन्या इरोस एंटरटेन्मेंट, बालाजी प्रॉडक्शन्स आणि शेमारू एंटरटेन्मेंट तसेच रेडिओ मिर्ची फिव्हर एफएम, हंगामा आणि बिंदास सारखे ग्रुप यात रुची दाखवतील असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर मुख्य दूरसंचार कंपन्या, इंटरनेट सेवा प्रदाता कंपन्या आणि ऑफलाईन स्ट्रीमिंग बाजाराच्या कंपन्या म्हणजेच व्होडाफोन, आयडिया, एअरटेल, प्रेसप्ले टीव्ही, मूव्हिंग टॉकिज, द्विंगलू, फ्रॉपकॉर्न, टूरिंगटॉकिज, मायफ्रीटीव्ही, जोंक आणि क्लाउडप्ले देखील याकरता समोर येण्याची अपेक्षा आहे. मंत्रालयाने मागील वर्षी कार्यकारी संचालक आर.पी. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक बिगरप्रवासभाडे महसूल संचालनालयाची स्थापना केली होती. तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जानेवारी महिन्यात बिगरप्रवासभाडे धोरण जारी केले होते. यात स्थानक आणि रेल्वेगाडय़ामंध्ये वायफायद्वारे कन्टेंट उपलब्ध करणे, एटीएमसाठी प्लॅटफॉर्मवर भाडेतत्वावर जागा देणे, जाहिरात होर्डिंगसाठी जागा उपलब्ध करणे या उपायांचा समावेश होता.