|Saturday, July 29, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘रॉ’चे एजंट समजून झाली होती अटक‘रॉ’चे एजंट समजून झाली होती अटक 

पाकिस्तानच्या ताब्यातील मौलवी भारतात परतले : परराष्ट्र मंत्री स्वराज यांचे मानले आभार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे पाकिस्तानमध्ये बेपत्ता झालेले दोन मौलवी सोमवारी भारतात परतले आहेत. मुख्य मौलवी असिफ अली आणि त्यांचे भाचे नाजिम अली निजामी यांनी भारतात परतल्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. रॉचे एजंट समजून पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र स्वराज यांनी याबाबत आग्रही मागणी करताना पाकिस्तानवर दबाव आणला होता.

8 मार्च रोजी ते पाकिस्तानला नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु लाहोरमधील दाता दरबार दर्ग्यामधून ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर पाकिस्तानने या मौलवींना मुक्त करून भारतात पाठवावे, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पाठपुरावा केला होता. दरम्यान, भाजप नेते सुब्रह्मणम स्वामी यांनी या दोन्ही मौलवीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ते दोघेही भारतात राहून पाकिस्तानसाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे.

भारतात परतलेल्या मौलवी नाजिम यांनी सुषमा स्वराज यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. ते म्हणाले, त्यांच्याबाबत पाकिस्तानमधील उम्मत नावाच्या दैनिकाने चुकीची माहिती छापली होती. आम्हा दोघांनाही पाकिस्तानी माध्यमांनी भारतीय गुप्तचर संस्था रॉचे एजंट ठरवले होते. त्याचबरोबर फोटोही छापला होता, असे सांगितले. सुरुवातीला कागदपत्रे अपुरे असल्याचे सांगून ताब्यात घेतल्याचेही ते म्हणाले. मात्र आता परत आल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह यांचेही आभार मानले आहेत.

तथापि पाकिस्तानी माध्यमांमधून याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. आयएसआय या पाकिस्तानच्या खतरनाक गुप्तचर संस्थेनेच या दोघांना गायब केल्याचा दावा करण्यात आला आहे. या दोघांचाही संबंध मुहाजीर कौमी मुव्हमेंट या संघटनेशी असल्याचा संशय व्यक्त केला होता. परंतु पाकिस्तानने या सर्वांचा इन्कार केला आहे. दोन्ही मौलवी त्यांच्या नातेवाईक व हितचिंतकांना भेटण्यासाठी सिंध प्रांतात गेले होते. मात्र तेथे मोबाईल सेवा नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ते दोघेही बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, भाजप नेते खासदार सुब्रम्हणम स्वामी यांनी मात्र या मौलवींच्या उद्दिष्टांबाबत संशय व्यक्त केला आहे. ते दोघेही खोटे बोलत असून स्वतःबद्दल सहानुभूती गोळा करत आहेत. इतके दिवस ते आयएसआयच्या ताब्यातच होते. ते देशविरोधी कारवाया करत असल्याची खात्रीशीर माहिती आपल्याकडे आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!