|Friday, July 28, 2017
You are here: Home » क्रिडा » तिसरा कसोटी सामना अनिर्णीततिसरा कसोटी सामना अनिर्णीत 

अर्धशतके झळकवणाऱया हँडस्कॉम्ब-शॉन मार्शच्या चिवट फलंदाजीने पराभव टाळण्यात कांगारूंना यश

वृत्तसंस्था/ रांची

स्टीव्ह स्मिथच्या सहकाऱयांनी भारतीय गोलंदाजांचा कडवा प्रतिकार केल्याने तिसऱया कसोटीतील पराभव टाळण्यात ऑस्ट्रेलियाने यश मिळविले. पीटर हँडस्कॉम्ब व शॉन मार्श यांनी चिवट फलंदाजी करीत अर्धशतके झळकवली आणि भारताला विजयापासून वंचित ठेवले. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या दिवशी 6 बाद 204 धावा जमवित सामना अनिर्णीत राखला. मॅरेथॉन द्विशतकी खेळी करणाऱया चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा बहुमान मिळाला.

2 बाद 23 अशा नाजूक स्थितीत शेवटच्या दिवसाची सुरुवात करणाऱया ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 100 षटकांत 6 बाद 204 धावा जमवित सामना अनिर्णीत राखला. यावेळी ऑस्टेलियाने 52 धावांची बढत मिळविली होती. भारताने पहिला डाव 9 बाद 603 धावांवर घोषित करून ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात 152 धावांची आघाडी मिळविली होती. हँडस्कॉम्ब व शॉन मार्श यांची जिगरबाज फलंदाजी ऑस्टेलियाची पराभवातून सुटका करणारी ठरली. हँडस्कॉम्बने नाबाद 72 धावा केल्या तर मार्शने 53 धावांचे योगदान दिले.  दोघांनी पाचव्या गडय़ासाठी 124 धावांची भागीदारी करताना सुमारे चार तासात तब्बल 62 षटके फलंदाजी केली. दिवसाच्या प्रारंभी कर्णधार स्मिथ (21) व सलामीवीर रेनशॉ (15) लवकर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते तर भारतीयांना विजयाची चाहुल लागली होती. पण हँडस्कॉम्ब-मार्श जोडीने जवळपास दुसरे सत्र चिकाटीने खेळून काढत भारताच्या आशेवर पाणी फेरले. जडेजाने मार्शला मुरली विजयकरवी झेलबाद करीत ही जोडी फोडली. पण दुसऱया बाजूने हँडस्कॉम्बने अखेरपर्यंत नाबाद राहत ‘अँकरमन’ची भूमिका चोखपणे बजावली. त्याने 200 चेंडू खेळून काढत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा केल्या. त्याचे हे तिसरे अर्धशतक आहे. मार्शने 53 धावांसाठी 197 चेंडू घेतले आणि त्यात 7 चौकारांचा समावेश होता.

जडेजाचा भेदक मारा

रेनशॉ-स्मिथ यांनी 21 षटके खेळून काढली. पण दोघेही पाठोपाठ बाद झाले. जडेजाने रफ पॅचचा उपयोग करीत दोघांना जखडून ठेवले होते. जडेजासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी ‘पॅड प्ले’चाच जास्त वापर केला. इशांतने रेनशॉला बाद करून भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले.  पुढील षटकात जडेजाच्या एका अप्रतिम चेंडूवर स्मिथ त्रिफळाचीत झाला. स्मिथने पॅड पुढे केला होता. पण चेंडू स्पिन झाला आणि पॅडला हुलकावणी देत ऑफस्टंपवर आदळला. अश्विनच्या गोलंदाजीवर शेवटच्या सत्रात मार्श यष्टिचीत होता होता बचावला तर हँडस्कॉम्ब एका रिव्हय़ूमधून सुटला. मार्शला अखेर जडेजाने बाद केले तर अश्विनने मॅक्सवेलला 2 धावांवर बाद केले. पण तोपर्यंत ऑस्टेलिया सुरक्षित स्थळी पोहोचले होते. स्मिथ बाद झाला तेव्हा ऑस्टेलियाची स्थिती 4 बाद 64 अशी झाली होती आणि दोन सत्रापेक्षा जास्त अवधी बाकी असल्याने भारताला विजयाची खात्री वाटू लागली होती. पण हँडस्कॉम्ब-मार्श यांनी दुसरे सत्र खेळून काढत प्रथम भारताची आघाडी भरून काढली आणि जेव्हा ही जोडी फुटली त्यावेळी संघ सुरक्षित अवस्थेत पोहोचला होता.

सकाळच्या पहिल्या सत्रात इशांत शर्मा खूपच भेदक वाटत होता. पण नंतरच्या दोन सत्रांत ऑसीजनी कडवा प्रतिकार करीत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. पुजारा व साहा यांनी मॅरेथॉन खेळी करीत भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली होती. पण हँडस्कॉम्ब-मार्श यांनी दडपण झेलण्याचे आव्हान स्वीकारत भारताला यश मिळवू दिले नाही. सामना अनिर्णीत राहिल्याने मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली असून आता धरमशालातील शेवटच्या कसोटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. येत्या शनिवारी 25 मार्चपासून ही कसोटी सुरू होत असून धरमशालामध्ये होणारी ही पहिलीच कसोटी असेल.

दोन्ही संघांतील खेळाडूंकडून कठोर प्रयत्न होत असल्याने शाब्दिक चकमकीचे प्रसंग उद्भवले असून शेवटचा दिवसही त्याला अपवाद ठरला नाही. रेनशॉ व इशांत शर्मा यांच्यात शाब्दिक चकमक झडली आणि नंतर इशांतने रेनशॉला पायचीत करीत त्याचा बळीही मिळविला. रवींद्र जडेजा भेदक ठरत होता. पण प्रमुख फिरकी गोलंदाज आर. अश्विनने मात्र निराशा केली. त्याला या सामन्यात फक्त 2 बळी मिळविता आले. जडेजाने 44 षटके गोलंदाजी करीत 54 धावांत 4 बळी मिळविले.

धावफलक : ऑस्टेलिया प.डाव 451, भारत प.डाव 210 षटकांत 9 बाद 603 डाव घोषित. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव (2 बाद 23 वरून पुढे)- वॉर्नर त्रि. गो. जडेजा 14 (16 चेंडूत 3 चौकार), रेनशॉ पायचीत गो. इशांत शर्मा 15 (84 चेंडूत 1 चौकार), लियॉन त्रि. गो. जडेजा 2, स्मिथ त्रि.गो. जडेजा 21 (68 चेंडूत 2 चौकार), शॉन मार्श झे. विजय गो. जडेजा 53 (197 चेंडूत 7 चौकार), मॅक्सवेल झे. विजय गो. अश्विन 2, मॅथ्यू वेड नाबाद 9 (16 चेंडूत 2 चौकार) अवांतर 16, एकूण 100 षटकांत 6 बाद 204.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-17, 2-23, 3-59, 4-63, 5-187, 6-190.

गोलंदाजी-आर. अश्विन 30-10-71-1, जडेजा 4-18-54-4, उमेश यादव 15-2-36-0, इशांत शर्मा 11-0-30-1.

कोहलीची चेंडूवर नाराजी

या कसोटीत वापरण्यात आलेल्या चेंडूबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. शेवटच्या दिवशी भारतीय आक्रमणाचा समर्थपणे मुकाबला करीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. ‘खेळपट्टीकडून अपेक्षित साथ मिळाली नसली तरी चेंडूच्या स्थितीमुळे आम्हाला यश मिळाले नाही. चेंडू अपेक्षेइतका टणक नसल्याने खेळपट्टीवर पडल्यानंतर तो फारसा उसळत नव्हता. चेंडू बदलण्यात आला तेव्हाही तो अपेक्षित दर्जाचा नव्हता. चेंडूमध्ये पुरेसा टणकपणा नसेल तर गोलंदाजांना विकेटकडून अपेक्षा वेग मिळू शकत नाही, असे मला वाटते. टणक चेंडू असता तर निकालात निश्चितच फरक पडला असता. पण कसोटी क्रिकेट आहे. परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी मिळतेच असे नाही. त्यात आमचीही परीक्षा होते. मात्र सामना अनिर्णीत राखण्याचे श्रेय ऑस्टेलियाला द्यायलाच हवे,’ असे कोहली म्हणाला. त्याने पुजारा, साहा व जडेजा यांच्या कामगिरीचेही कौतुक केले.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!