नव्या पुलामुळे सांगलीचे दळणवळण वाढणार

संजय गायकवाड / सांगली
सांगलीच्या कृष्णा नदीवर आयर्विन पुलाला पर्यायी म्हणून आणखी एक नवा पुल उभारण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सांगलीच्या नव्या पुलासाठी 25 कोटीचा निधी मंजूर केला आहे. या नव्या पुलामुळे सांगलीकरांना मुंबई पुण्याकडे जाण्यासाठी चांगला आणि जवळचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे सांगलीच्या दळणवळणात वाढ होणार आहे. त्यामुळे सांगलीच्या विकासाला गती येणार आहे. हरिपूर येथेही लवकरच नवा पुल उभारण्यात येणार असून सांगलीकरांना यामुळे एक नव्हे तर चार पुल उपलब्ध होणार आहेत.
…आयर्विन पुल सांगलीचा मानबिंदू
सांगलीच्या कृष्णा नदीवर आयर्विन पुल उभारल्यामुळे सांगलीच्या विकासाला मोठा हातभार लागला. पुर्वी हा पुल नसल्याने सांगलीकरांना पुण्या मुंबईकडे जाण्यासाठी पाचव्या मैलावरून जावे लागत होते. ही घटना साधारणपणे 80वर्षापुर्वीची आहे. त्यावेळी सांगली हे जरी छोटेशे शहर असले तरी त्यावेळी सांगली हे एक मोठे खेडेगावंच म्हणूनच ओळखले जायचे, तरीही लोकांची आणि वाहनधारकांची गैरसोय होत होता हे मात्र खरेच, कारण पलूसहून पुढे त्यावेळी एकतर ताकारीहून इस्लामपूरमार्गे पेठहून राष्ट्रीय महामार्गाला यावे लागत होते. ताकारी येथेही सध्याचा राजारामबापू सेत म्हणून नामकरण झालेला कृष्णा नदीवरील पुल उभारूनही फारशी वषी झालेली नाहीत. ताकारीचा पुलही साधारणपणे 60 वर्षापुर्वीचा तर भवानीनगर, शेणोलीवरून पुढे वडगाव हवेली व कार्वेच्या पुढेही कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला पुलही तसा नवीनच, त्यामुळे ज्यावेळी सांगलीत आयर्विनची उभारणी झाली, त्यावेळी खऱया अर्थाने सांगलीच्या विकासाची नवी दारे खुली झाली असे म्हंटले तर वावगे होणार नाही.
..सांगली बाजारपेठेला पुलाचा फायदा
मुळातच सांगली हे बाजारपेठेचे शहर म्हणून पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथील मार्केट यार्ड, गणपती पेठ, विष्णूअण्णा फळ मार्केट यासह वखारभाग, टिंबर एरिया, कापड पेठ आदी ठिकाणी प्रसिध्द आहेत. सांगलीतून मोठया प्रमाणात माल बाहेर जातो व तेवढाच या शहरातही येतेही. त्यामुळे सांगलीला उतारपेठ म्हणूनही ओळखले जाते. विशेषतः गुजरात, राजस्थान, मुंबईच्या दिशेने येथून मोठया प्रमाणात विविध प्रकारचा माल जातो. तर कर्नाटक, कोकण आंधप्रदेश येथून अनेक प्रकारचा शेतीमाल सांगलीत येतो. त्यामुळे येथे दिवसभर मालमोटीरींचा राबता असतो. त्यामुळे येथे महापालिकेने खास मालमोटीरीसाठी वखारभागात वाहनतळ उभारला आहे. त्यामुळे सांगलीच्या नव्या पुलाचे महत्व आहे.
बायपास रोडवरील नव्या पुलाचा सांगलीला फायदा
त्याशिवाय माधवनगर, हरिपूरसह आसपासच्या पंचवीस ते तीस गावांचा रोजचा सांगलीशी मोठा संपर्क आहे. त्यामुळे शिक्षण, व्यापार, उद्योग व अन्य कारणाने या आसपासच्या गावातील लोक रोज सांगलीला येतात. आयर्विनवरील अवजड वाहतूक बंद करण्यापुर्वी आणि बायपास रोडवर नवा पुल उभारण्यापुर्वी माधवनगरच्या दिशेने येणारी सर्व वाहने ही सांगलीतून आयर्विनवरूनच पुढे पुण्या मुंबईकडे जात असत. सध्या या भागातील वाहनधारकांना बायपास रोडवरील नव्या पुलाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याबरोबरच इस्लामपूर, कवठेपिरान समडोळी या भागातून येणाऱया व पुढे तासगाव तसेच कर्नाटकातील शहरांकडे जाणाऱया एस.टी. गाडयांना व अन्य वाहनधारकांनाही आयर्विन पुलाचाच वापर करावा लागत होता. सध्या या दिशेने येणारी वाहने ही बायपास रोडने ये जा करतात.
…वाहतुकीची कोंडी कमी होणार.
तसे पाहिले तर आयर्विनवरील अवजड वाहतूक बंद केल्यानंतर बायपास रोडवरील वाहतूक वाढली आहे. एस.टी. आणि सिटी बसेस, ट्रक, कंटेनर आदी वाहनांचा यात समावेश आहे. पण बायपास रोडवरील नव्या पुलाकडे जाणाऱया एसटी व अन्य वाहनांना एकतर महापालिका, शहर पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ, मित्र मंडळ चौक, तानाजी चौक, बुरूड गल्ली, कर्नाळ पोलीस चौकी या मार्गे बायपास रोडवरील पुलाकडे जावे लागते. हा मार्ग अतिशय अरूंद व अतिक्रमणाने भरलेला आहे. दुसरीकडे आजही रिक्षासह छोटी वाहने ये जा करतात.
हरिपूरच्या नव्या पुलांमुळे सांगली कोल्हापूर जिल्हयांना फायदा
त्यामुळे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या नव्या पुलामुळे सांगलीच्या दळणवळणात मोठी वाढ होईल. अशी अपेक्षा आहे. कारण हरिपूरजवळही कोथळीला जोडणारा आणखी एक पुल उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे सांगली व कोल्हापूर हे दोन जिल्हे आणखी जवळ येणार आहेत. यामुळे सांगलीकरांना कोल्हापूरला जाण्यासाठी एक नवा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. तर जयसिंगपूर, कोथळी या भागातून सांगलीला भाजीपाला, दुध आदी वस्तूं विक्रीसाठी आणणाऱया विक्रेत्यांची चांगली सोय होणार आहे.