|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात शिकारी तरूणाचीच झाली शिकार

चिपळुणात शिकारी तरूणाचीच झाली शिकार 

प्रतिनिधी / चिपळूण

शिकारीला गेलेल्या तरूणाचीच सहकाऱयांकडून शिकार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री पोफळी येथील जंगलातील जुने सोनपात्र परिसरात घडली. विशेष म्हणजे माणुसकी विसरत साथीदार मृतदेह तेथेच सोडून आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन गट शिकारीला गेल्याने व एकमेकाबाबत माहिती नसल्याने सावजाच्या आशेपोटी ही घटना घडल्याचे पुढे येत आहे.

नितीराज धोंडीराम बडदे (35, पोफळी-होडेवाडी) असे या तरूणाचे नाव आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री पोफळी परिसरातील दोन गट शिकारीसाठी जंगलात गेले होते. मात्र ते वेगवेगळय़ा वेळेला गेल्याने एकमेकाबाबत कोणालाही माहिती नव्हती. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नितीराज असलेल्या गटाचा आवाज झाल्याने दुसऱया गटातील शिकाऱयांना पुढे सावज आहे, असे वाटले. त्यामुळे त्यांनी त्या दिशेने गोळीबार केला. यातील एक गोळी नितीराज याला लागली व तो जागीच गतप्राण झाला.

त्यानंतर त्याचे सहकारी त्याचा मृतदेह तेथेच ठेऊन पळून गेले. नितीराज हा सायंकाळी आपली डमडम रिक्षा घेऊन कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. त्यामुळे तो सोमवारी सकाळी घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. यावेळी कुंभार्ली घाटात एका ठिकाणी त्याची रिक्षा उभी असल्याचे दिसून आले. त्यामुळे नातेवाईक जंगलाच्या दिशेने गेले. यावेळी वरील ठिकाणी त्याचा मृतदेह पडला होता. यावेळी त्याला गोळी लागल्याचे दिसून आले.

त्यामुळे याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, उपनिरीक्षक सुरेश पवार आदी पथकासह तेथे गेले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह जंगलातून बाहेर काढण्यात आला. या बाबतची खबर त्याचा भाऊ संजय बडदे यांनी दिली असून त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या बाबतचा तपास पवार करीत आहेत. नितीराज याच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.

संशयितांचा शोध सुरू

या घटनेमुळे पोफळी पंचक्रोशीत खळबळ उडाली असून सहकारी पळून आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नसला तरी मिळालेल्या माहितीनुसार संशयितांचा शोध सुरू केला आहे. यातील काही संशयित गावाबाहेर पळून गेल्याची चर्चाही सुरू आहे.