|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहर मोकळा श्वास घेणार का?शहर मोकळा श्वास घेणार का? 

प्रतिनिधी/ सातारा

गेल्या तीन चार दिवसांपासून साताऱयात अतिक्रमण काढण्याची मोहिम जोरदारपणे सुरू होती. त्यामुळे सातारा शहर मोकळं मोकळं वाटायला लागलं होतं. आता कुठेतरी शिस्त लागेल असे सर्वसामान्य सातारकराला अपेक्षा होती. परंतु खासदार  उदयनराजे भोसले यांनी अतिक्रमण मोहिमेत उडी घेतली व सर्व मोहिमेचाच बट्टय़ाबोळ करून टाकला. सातारा शहरात आत्ता कुठे मोकळा श्वास घ्यायला सुरूवात केली होती, परंतु उदयनराजे भोसले यांनी दमदाटी करून सातारा पालिकेला ही मोहिम गुंडाळण्यास भाग पाडले. सर्वसामान्य हातगाडीवाले, टपऱयावाले यांच्या नजरेत उदयनराजे जरी हिरो झाले असले तरी अनेक सातारकरांना खासदारांचे हे वागणे आवडले नसल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. हातगाडेवाले, टपऱयावाले यांचे हातावर पोट असते त्यांच्या पोटावर पाय देणे जसे योग्य नाही तसे अतिक्रमण करणेसुद्धा योग्य नाही. खासदारांनी ही अतिक्रमण मोहिम थांबवण्यापेक्षा त्या अतिक्रमित लोकांसाठी पर्यायी जागा उत्पन्न करून देणे गरजेचे होते. परंतु तेही केले गेले नाही. त्यामुळे सातारकर सध्या पालिका प्रशासनावर नाराज दिसत आहेत. 

नगरपालिकेत मनोमिलनाची सत्ता उलथवून सातारकरांनी उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला एक हाती सत्ता मिळवून दिली. यावेळी सातारा विकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात अतिक्रमण हटवून शहरातील गबाळपणा घालवून टाकू, असे आश्वासन दिले होते. नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेऊन सातारा शहरातील अतिक्रमण मोहिम काढण्यास सुरूवात केली. यावेळी अनेक ठिकाणची बेकायदा बांधकामे पाडून टाकण्यात आली. तसेच सातारा एस.टी. स्टँन्ड परिसर, स्टेडियम, भूविकास बँक येथील सर्व हातगाडय़ा, अतिक्रमीत टपऱया सर्व काढून टाकण्यात आल्या. त्यावेळी हे सर्व विक्रेते एकत्र येऊन उदयनराजेंना भेटायला गेली, परंतु नेहमीप्रमाणे महाराज साहेब पुणे अथवा दिल्ली येथे असल्याचे सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण मोहिमेने वेग घेतला. बाँम्बे रेस्टॉरंट चौकातही पुलाखाली, आजूबाजूला महामार्गालगत अनेक प्रकारचे अतिक्रमण झालेले आहे. ते काढून टाकण्याचे काम जोरदार सुरू होते. अशा वेळी खासदार साहेबांची एन्ट्री झाली. व नेहमीच्या स्टाईलने त्यांनी अधिकाऱयांना फैलावर घेतले. आधी बुल्डोजर जलमंदिरला लावा मग गरिबांवर चालवा असे भावनिक आवाहन करून त्यांनी तेथील उपस्थित जनतेच्या काळजाला हात घातला.

परंतू ही वरवरची मलमपट्टी झाली. आता पुन्हा एकदा हळूहळू आहे त्या जागेवर अतिक्रमण सुरू होईल. परंतू खासदार साहेबांनी अभ्यासपूर्वक नियोजन करून पालिका अधिकारी व विक्रेत्यांची संयुक्त बैठक घेऊन रितसर कायदेशीर तोडगा काढणे अपेक्षित होते. परंतु यापैकी काही झाले नाही. उदयनराजेंना या गरीब विक्रेत्यांबद्दल जर खरच प्रेम, आपुलकी, आदर असता तर त्यांनी नगरपालिकेत रितसर ठराव करून हातगाडीवाल्यांसाठी ठिकठिकाणच्या जागा आरक्षित केल्या असत्या. कायद्यामध्ये जे जे बसेल ते करून त्यांना कायमचा व्यवसाय करायला सवलत दिली असती. त्यांच्या डोक्यावरची उभी टांगती तलवार कायमची दूर केली असती. परंतू यापैकी काही झाले नाही. त्यांनी भले ही मोहिम थांबवली. यातून साध्य काय झाले? आजही टपऱयावाले, हातगाडीवाले भितीखालीच व्यवसाय करणार, अतिक्रमण वाढत जाणार आधिक शहरातील रस्ते अपुरे आहेत. ते आणखी अपुरे होणार. त्यामुळे सूज्ञ सातारकर आपल्या लाडक्या खासदारावर यावेळी नाराज झाला आहे. नगरपालिकेतील विरोधी पक्षही मताच्या लालसेपोटी गप्प आहे. उदयनराजेंना फक्त फिरते हातगाडे, टपऱया, रस्त्याकडेला बसणारे विक्रेते, फळविक्रेते यांनीच मतदान केले नाही. तर सूज्ञ सातारकरांनीही मतदान केले आहे. त्यामुळे त्यांच्याही विचार होणे गरजेचे आहे.

पालिका अधिकाऱयांनी पोलीस बंदोबस्तात सुरू केलेली ही मोहिम उदयनराजेंनी बंद पाडली. पण त्यावर उतारा काही दिला नाही. ही कामाची पद्धत योग्य नसल्याचे स्थानिक सातारकरांना वाटू लागले आहे. विकास करताना कोठेतरी कठोर निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेताना कोणावर अन्याय होऊ नये हे बघणेही तेवढेच महत्वाचे आहे. परंतू येथे यापैकी काहीच दिसत नाही. उदयनराजेंनी आतातरी अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावेत. अशी सातारकरांची अपेक्षा आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!