|Saturday, August 5, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादई लवादासमोर आज सुनावणीम्हादई लवादासमोर आज सुनावणी 

प्रतिनिधी/ पणजी

म्हादई जलतंटा लवादासमोर आज मंगळवार दि. 21 रोजी सुनावणी होणार आहे. या पावसाळ्य़ात सात टीएमसी पाणी वळवण्यासाठी कर्नाटक नव्याने याचिका सादर करण्याची शक्यता आहे.

म्हादई जलतंटा लवादासमोर गोव्याच्या साक्षीदाराची साक्ष आणि उलटतपासणी यापूर्वी पूर्ण झाली आहे. कर्नाटकचे साक्षीदार डॉ. गोसाईन यांनी प्रमुख साक्षीदार म्हणून आपले प्रतिज्ञापत्र सादर केले असले तरी उलट तपासणीसाठी कर्नाटक चालढकल करीत असून सुनावणी पुढे ढकलण्यासाठी वारंवार विनंती करुन उलट तपासणीस टाळाटाळ करीत आहे.

उलटतपासणीसाठी कर्नाटकची चालढकल

भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी गोव्याची बाजू मांडत आहेत. त्यांच्या उलट तपासणीला सामोरे जाण्याचे धाडस नसल्याने टाळाटाळ चालली होती. ऍड. नाडकर्णी यांना हटविण्यास त्यांना तात्पुरते यश आले होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिफारस केल्याने कायदा मंत्रालयाने ऍड. नाडकर्णी यांना बाजू मांडण्यास नव्याने मान्यता दिली आहे. ऍड. आत्माराम नाडकर्णी उलट तपासणीसाठी नसणार या आनंदाने कर्नाटकने आपल्या साक्षीदाराची उलटतपासणीची तयारी ठेवली होती, पण आज सुनावणी सुरु झाल्यानंतर कर्नाटक उलटतपासणीला सामोरे जाते की परत चालढकल करणार आहे ते स्पष्ट होणार आहे.

गोव्याकडून नवा अर्ज सादर होणार

गोव्याचे साक्षीदार चेतन पंडित यांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली असली तरी कर्नाटकने चालविलेला रडीचा डाव मोडण्यासाठी चेतन पंडित यांना परत साक्षीदाराच्या कक्षात बोलावण्यासाठी गोवा नव्याने अर्ज करणार आहे.

चेतन पंडित यांची साक्ष पूर्ण होताच आता कर्नाटकने नवी आकडेवारी सादर केली. पूर्वीच्या आकडेवारीप्रमाणे पावसाचे प्रमाण अधिक होते व म्हादई परिसरात पावसाचे पाणी अधिक असल्याने ते अरबी समुद्रात जाऊन वाया जात असल्याचे निमित्त करुन सात टीएमसी पाणी वळवण्यासाठी कर्नाटकने अर्ज केला होता.

हा अर्ज म्हादई जलतंटा लवादाने फेटाळला. त्या निवाडय़ाला कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक मुद्यावर प्राथमिक बाजूही ऐकून घेण्यास नकार दिल्याने अखेर सादर केलेली याचिका मागे घेऊन लवादासमोर नव्याने याचिका सादर करण्याची अनुमती घेतली.

आता कर्नाटकने नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करुन पूर्वीची सर्व आकडेवारी बदलली आहे व पावसाचे प्रमाण कमी दाखवून कर्नाटकात दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली आहे. या मुद्यावर सात टीएमसी पाणी वळवण्याचा नवा अर्ज कर्नाटककडून सादर होण्याची शक्यता आहे. या प्रतिज्ञापत्रातील सर्व मुद्दे खोडून काढण्यासाठी गोव्याच्या साक्षीदाराला परत उलट तपासणीसाठी बोलावण्याची गोव्याची तयारी असून त्यासाठी गोवा सरकार आज मंगळवारी अर्ज करणार आहे.

म्हादई जलतंटा लवादाला एकदा मुदतवाढ मिळालेली आहे. त्यामुळे आणखीन मुदतवाढ मागण्याची वेळ येण्यापूर्वी सुनावणी पूर्ण होणे आवश्यक आहे. एकूण 72 मुद्यांवर युक्तिवाद करण्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दोन्ही राज्याकडून प्रमुख साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या साक्षीदाराला संधी मिळणार आहे. त्यामुळे सलग सुनावणी व्हावी, असा मुद्दा गोवा सरकार या नव्या अर्जात करणार आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!