|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » माणगाव परिषद वर्धापन दिनी अभिवादन रॅली

माणगाव परिषद वर्धापन दिनी अभिवादन रॅली 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली 21 व 22 मार्च 1920 मध्ये  माणगाव परिषद झाली. या परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जनतेचे नेते म्हणून शाहू महाराजांनी घोषणा केली होती.  या ऐतिहासिक मानगाव परिषदेच्या 97 व्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे बिंदू चौक ते माणगावपर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली. मानगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, अशा घोषणांमध्ये ही रॅली माणगावकडे मार्गस्थ झाली. 

येथील बिंदू चौकात महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन रॅली माणगावकडे मार्गस्थ झाली. राजर्षी शाहू महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणांनी परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. रिपब्लिकन पार्टीचे कार्यतर्के गळय़ात निळा मफलर, गाडीला निळा झेंडा लावून रॅलीत सहभागी झाले होते. पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी डॉ. अनिल माने, शामप्रसाद कांबळे, अविनाश शिंदे, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.