|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची खर्चमर्यादा वाढणार

कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची खर्चमर्यादा वाढणार 

शहर वार्ताहर / दापोली

राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची खर्चमर्यादा वाढवण्याबाबत कृषीमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असून कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने याबाबत सकारात्मक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे, असा विश्वास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

कोकण कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ 23 तारखेला होणार असून या कार्यक्रमाची माहिती डॉ. भट्टाचार्य यांनी यावेळी दिली. त्यांच्यासोबत विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे आणि संशोधन संचालक उत्तम महाडकर उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त राज्यपाल अर्थात कुलपती, कृषीमंत्री आणि कुलगुरू एकाच व्यासपीठावर येण्याचा हा राज्यातील पहिलाच योग आहे, असे स्पष्ट करत कुलगुरूंनी सांगितले की, यावेळी आंबा प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून विद्यापीठातर्फे विकसित ‘मँगो ऍप’ या मोबाईल ऍप्लिकेशनचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. हे ऍप्लिकेशन बाल्यावस्थेत असून त्यात सुधारणा करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विद्यापीठांच्या मंजूर निधीतून तीन लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च करायची असेल, तर कुलगुरूंना कार्यकारी परिषदेत ठराव करून तो महाराष्ट्र कृषी व शिक्षण परिषदेकडे पाठवावा लागतो. त्यातही या परिषदांची बैठक वर्षातून दोनदाच होते. त्यामुळे त्यामुळे खर्चाला मान्यता मिळण्यास विलंब होऊन कृषी विद्यापीठातील शिक्षण, संशोधनासाठीच्या आवश्यक विकास कामांना खीळ बसते. या खर्चाची मर्यादा तीन लाखांवरून 50 लाख रूपयांवर न्यावी, असा प्रस्ताव आपण कुलगुरू आणि कृषीमंत्र्यांकडे यापूर्वीच केला होता. त्याला राज्यसरकारने अनुकूल प्रतिसाद दिला असून पदवीदान समारंभाच्या निमित्ताने याबाबत सकारात्मक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यपाल सी. विद्यासागर राव, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि कोलकता उच्च न्यायालयाचे जे. एन. पटेल आदी विशेष मान्यवर या समारंभास उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. भट्टाचार्य यांनी यावेळी दिली.