|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापालिकेची ‘महसूल’ खात्यावर मेहरनजर

महापालिकेची ‘महसूल’ खात्यावर मेहरनजर 

प्रतिनिधी/ मिरज

थकीत घरपट्टी वसूलीसाठी सामान्यांच्या मिळकती सील करणाऱया, पाणी  कनेक्शन तोडणाऱया महापालिकेने सुमारे साडेदहा लाख रूपयांची थकबाकी असणाऱया महसूल विभागावर मात्र ‘मेहरनजर’ दाखवली आहे. थकीत वसूलीसाठी गोदामे सील करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱयांना अचानक वरिष्ठांचा फोन आल्याने त्यांच्या दबावाने धान्यांने भरलेली गोदामे सील न करता केवळ रिकामी गोदामे सील करून कारवाई केल्याचे नाटक करीत परतावे लागले.   

 शहरातील नदिवेस परिसरातील वैरण बाजार आवारात असलेल्या शासकीय धान्य गोदामांच्या इमारतींची तब्बल दहा लाख, 38 हजार, 146 रुपयांची घरपट्टीची रक्कम थकबाकी आहे. या रक्कमेच्या वसुलीसाठी महापालिकेने वारंवार महसूल विभागाकडे तगादा लावला होता. तरीही ही थकीत पट्टी महसूल विभागाने भरली नव्हती. त्यामुळे बुधवारी महापालिका वसूली अधिकारी कर्मचारी यांनी या गोदामांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. हे कर्मचारी धान्यांनी भरलेली गोदामे सील करणार होते. मात्र, एवढय़ात अधिकाऱयांची फोन खणाणले. आणि तात्काळ भरलेली गोदामे सील करण्याचे काम थांबले.

मात्र, थकीत पट्टीच्या वसूलीसाठी कारवाई करण्याचा प्रयत्न कागदावर मांडणे आवश्यक होते. त्यामुळे अधिकाऱयांनी नामी शक्कल लढवली. रिकामी धुळखात पडलेली गोदामे सील करण्याची वेळ अधिकाऱयांवर आली. सर्वसामान्य जनतेच्या मिळकती काही हजारांची रक्कम थकीत असली तरी, सील करणाऱया मनपा प्रशासनाने महसूल खात्यावर मेहरबानी दाखविण्यामागचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र या प्रकाराने थकबाकी वसुलीसाठी मोहिमेवर बाहेर पडलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱयांचे मानसिक खच्चीकरण त्यांच्याच अधिकाऱयांनी केल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

मालमत्ता कर, घरपट्टी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने जोरदार मोहिम उघडली असून, रक्कम न भरल्यास मिळकत सील करण्याची तसेच वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई मनपाने सुरू केली आहे. कोटय़ावधींची थकबाकी लक्षात घेता मनपा प्रशासनाने कारवाईसाठी पाऊल उचलणे योग्यच आहे. मात्र अशी कारवाई करताना मनपा प्रशासनाने सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, अशीच अपेक्षा कर्मचाऱयांची असते. मात्र शहरात आजवर वेळावेळी झालेल्या कारवाईत लाखोंची थकबाकी असणाऱया राजकीय नेते, अधिकारी, बडे उद्योजक, मात्तब्बर आणि प्रतिष्ठीत मंडळींवरील कारवाई टळली गेली असल्याचे दिसून येते. उलट गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला मात्र किरकोळ रक्कमेच्या वुसलीसाठी वेठीस धरले जाते.

शासकीय गोदामांवरील कारवाईचे केलेला फार्स चुकीचा संदेश देणारा आणि कर्मचाऱयांचे मानसिक खच्चीकरण करणारा आहे. मनपा घरपट्टी विभागाचे प्रमुख संभाजी मेंढे, वॉरंट ऑफिसर भगवान कोळी, पिंटू उत्तुरे, हेमंत माळवदे, प्रशांत गुरव, राजू लोंढे, जावेद इनामदार, राजू गावडे, खिजर सय्यद, लियाकत दर्यावर्दी, अकबर फकीर, रियात खतीब, दळवी आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.