|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवली न.पं.ला मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांसाठी निधी

कणकवली न.पं.ला मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांसाठी निधी 

कणकवली : कणकवली शहरातील नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून नागरी सुविधांसाठी सहाय्य योजनेंतर्गत 2 कोटी 25 लाखाचा निधी देण्यात आला आहे.  शहरातील अन्य विकासकामांसाठी विशेष निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या निधीमुळे शहरातील विकासकामांना न्याय देणे सोपे जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

न. पं.च्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत सौ. गायकवाड व पारकर बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, विरोधी गटनेत्या राजश्री धुमाळे, भाई परब आदी उपस्थित होते.

पारकर म्हणाले, माजी आमदार प्रमोद जठार, कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यासाठी पाठपुरावा घेतल्याने हा निधी न. पं.ला प्राप्त झाला आहे. न. पं.च्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन या निधीतून शहरात सुविधा देण्यात येणार आहेत. हा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानत असल्याचे पारकर यांनी सांगितले. या वर्षीच्या नगरोत्थान आराखडय़ात क्रीडांगण, बगीचा आरक्षण विकसित करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.

शहर विकास आराखडय़ातील 56 नंबरचे खेळाच्या मैदानाचे आरक्षण विकसित करण्यासाठी लवकरच जमीन मालकांची बैठक घेण्यात येणार आहे. 2 कोटी 25 लाखाच्या निधीतून शहरातील रस्ते, लाईट, नवीन रस्ते, गटारांची बांधकामे अशी कामे घेण्यात येणार आहेत. दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्हय़ाला 2015-16 मध्ये 80 लाख मंजूर झाले होते. शहरातील समाज मंदिराचे जे काम सुरू आहे, त्याला 32 लाखाचा निधी आवश्यक असल्याने या कामासाठी निधीची मागणी करण्यात आल्याचे पारकर यांनी सांगितले. त्यामुळे या विषयावरून करण्यात आलेले आरोप निरर्थक असल्याचा टोला त्यांनी लगावला. 2017-18 मध्ये या योजनेंतर्गत 63 लाखाची मागणी करण्यात आली आहे.

सदनिका खरेदी करताना पडताळणी करून घ्या!

शहरात सध्या अनधिकृत बांधकामाबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे या पुढे ज्या संबंधितांना सदनिका खरेदी करायची असल्यास त्यांनी बिल्डरकडून खरेदी करायच्या असलेल्या सदनिकेचा प्लान घेऊन न. पं.च्या अधिकाऱयांना भेटावे. या बाबत खात्री करूनच नागरिकांनी सदनिकांची खरेदी करावी, असे आवाहन पारकर यांनी केले. याबाबत माहिती देण्यासाठी अधिकाऱयांकडून टाळाटाळ झाल्यास आमच्याशी संपर्क साधा. 1997 पासून प्राधिकरण झाल्यानंतर शहरातील बांधकामांना रितसर परवानगी देण्यात आल्याचे पारकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related posts: