|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » किल्ले सिंधुदुर्ग स्फूर्तिदायक

किल्ले सिंधुदुर्ग स्फूर्तिदायक 

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग म्हणजे स्फूर्तिस्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा घेण्यासाठी आपण येथे आलो आहे, अशा भावना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट दिल्यानंतर व्यक्त केल्या. त्यांना इतिहास संशोधक अमर आडके यांनी किल्ले सिंधुदुर्गच्या इतिहासाची माहिती दिली. राज्यपालांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासाबाबत प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्याचेही निर्देश दिले.

राज्यपालांनी तारकर्ली येथून स्पीडबोटीतून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतच प्रवास केला. किल्ल्याच्या अर्ध्या तासाच्या भेटीत त्यांनी पर्यटनातून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासाबाबत पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली. यावेळी आमदार वैभव नाईक, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, मुख्याधिकारी रंजना गगे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पुरातत्व खात्याचे अधिकारी दिवेकर व अन्य विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. किल्ला रहिवासी संघातर्फे सयाजी सकपाळ यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

मालवण पालिकेला ऐतिहासिक भेट

मालवण पालिकेच्या 100 वर्षांच्या इतिहासात प्रथमच राज्यपालांनी भेट दिली. पालकमंत्री केसरकर यांच्या विनंतीवरून राज्यपाल सिंधुदुर्ग किल्ल्यावरून तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे जात असताना त्यांनी मालवण पालिकेला भेट दिली. नगराध्यक्ष महेश कांदळकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर व अन्य नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले. नंतर पालिका सभागृहात छोटेखानी स्वागत कार्यक्रम झाला. प्रास्ताविकात नगरसेवक नितीन वाळके यांनी नगरपालिका मे 2017 मध्ये 100 वर्षांची होत असल्याने शतक महोत्सवाचे उद्घाटन राज्यपालांच्याच भेटीने होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. राज्यपालांच्या भेटीने नगरपालिकेत काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळकर म्हणाले. आमदार नाईकनी मालवणच्या नावाचा राज्यपालांनी आपल्या अधिवेशनाच्या अभिभाषणात उल्लेख केला आहे. त्यामुळे राज्यपालांचे येथे लक्ष असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या भेटीने पर्यटनातून समृद्धी येण्यासाठी एक पाऊल पुढे जाणार आहे, असे सांगितले. केसरकरांनी राज्यपालांनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी केंद्रीय पुरातत्व खाते व अन्य सर्व विभागांची एकत्र बैठक राजभवनात घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगून सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाची जाण असलेले राज्यपाल असल्याचे स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ!

देशाच्या विकासात पर्यटनाला मोठे महत्व आहे. भारताप्रमाणे अन्य काही देशांमध्येही पर्यटनातून क्रांती झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनमधून येथे स्वच्छतेचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न होण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी पुरातत्व खात्याने राज्य शासनाला साथ केली पाहिजे. निसर्ग संपत्तीचे रक्षण करून पर्यटन विकास साधला पाहिजे. येथील मच्छीमार बांधवांच्याही समस्या सोडविण्यासाठी नियोजन होणे महत्वाचे आहे. शासनाने त्यासाठी पुढाकार घेतल्यास राजभवनाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. आपण बैठकीचे नियोजन केल्यास मी सहभागी होईन, असेही आश्वासन राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिले.

सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार केणी, यतीन खोत, ममता वराडकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, सेजल परब, सुनीता जाधव, पूजा सरकारे, दीपा शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर आदी नागरिक उपस्थित होते.

राज्यपाल सर्वसामान्यांमध्ये मिसळले!

प्रोटोकॉलप्रमाणे राज्यपालांचा दौरा सिंधुदुर्ग किल्ला येथून तारकर्ली असा होता. मात्र, त्यांनी पालकमंत्र्यांच्या विनंतीवरून मालवण पालिकेला भेट दिली. या भेटीत त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करीत हस्तांदोलन केले. सर्वांसोबत फोटोही काढले. राज्यपालांची भेट घेणाऱयांसाठी प्रशासनाने कार्डचे वाटप केले होते. मात्र, पालिकेत राज्यपालांची सर्वसामान्य नागरिकांनीही भेट घेतली. राज्यपालांनी सिंधुदुर्गातील जनता चांगली असल्याचेही कौतुक केले. किल्ल्यावर पत्रकारांशी बोलणे टाळले असताना त्यांनी पालिकेत मार्गदर्शन केले. पालिकेतर्फे राज्यपालांना शतक महोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण नगराध्यक्षांनी दिले.

स्कुबा डायव्हिंग सेंटर मुंबई विद्यापीठाशी संलग्न करण्यासाठी प्रस्ताव पाठवा!

 तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्कुबा डायव्हिंग सेंटर ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न करून या ठिकाणी ‘समुद्री जीवशास्त्र संवर्धन’ आणि ‘समुद्री शास्त्र पर्यटन’ या दोन विषयातील डिप्लोमा व पदव्युत्तर पदवी संशोधन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱयांना सूचना दिल्या. राज्यपालांनी सकाळी स्कुबा डायव्हिंग सेंटरला भेट दिली. या भेटीदरम्यान संस्थेचे कार्य पाहिल्यानंतर त्यांनी वरील सूचना दिल्या. या बाबतचा प्रस्ताव त्वरित पाठवण्याचे आदेशही त्यांनी दिले. तारकर्ली येथील या स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे सेंटर मुंबई विद्यापीठाशी संलग्न केले तसेच सागरशास्त्र व सागरी पर्यटनाशी संबंधित अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केले, तर स्थानिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.  त्यातून उत्तम प्रकारचे पर्यटन व रोजगार निर्मितीही होईल. हा उद्देश समोर ठेवूनच राज्यपालांनी वरील सूचना केल्या. यावेळी त्यांनी संस्थेचे संचालक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. तसेच या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले स्थानिक स्कुबा डायव्हर्स व जिल्हय़ातील पहिली प्रशिक्षित महिला स्कुबा डायव्हर हर्षाली मांजरेकर यांचे कौतूक केले.