|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कल्पनेच्या जगाला सीमा नसतात!

कल्पनेच्या जगाला सीमा नसतात! 

प्रतिनिधी/ बेळगाव

कवितेचे जग कल्पनेवर आधारलेले असले तरी त्यात भावभावना आणि उत्सुकता असते. उत्कट उत्सुकताच कल्पना करायला शिकविते आणि कल्पनेच्या जगाला सीमा नसतात. यामुळेच कविता लिहिणे अवघड आणि जोखमीचेही आहे, असे मत ज्ये÷ साहित्यिक डॉ. चंद्रकांत कुसनूर यांनी व्यक्त केले.

डॉ. शोभा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या दि इनव्हिजीबल थ्रेड या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. येथील लोकमान्य ग्रंथालयात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी वक्त्या म्हणून डॉ. आशालता कुलकर्णी, डॉ. सुषमा पाटणेकर उपस्थित होत्या.

कवितेचे नियम असतात. मात्र सर्जनशीलता महत्त्वाची आहे. प्रत्येक शब्द आणि वाक्मय यांची रचना कशी हवी हे महत्त्वाचे असून त्याकडे लक्ष दिले न गेल्यास कवितेचे नुकसान होते. तुम्हाला योग्यरीत्या संवाद करता आले पाहिजेत. नाही तर कवितेतील संवादांचेही नुकसान होते. विचार करायला हवा. समजून घेणे आणि अनुभुती घेणे यात फरक आहे. याची नोंद कवींनी आपल्या पुढील लेखनात घ्यायला हवी, अशी सूचनाही यावेळी डॉ. कुसनूर यांनी केली.

ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष अशोक याळगी यांनी स्वागत केले. किशोर काकडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी बुके नव्हे तर बुक देऊन पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या कविता संग्रहाबद्दल डॉ. शोभा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. शब्द सुंदर असतात. कवी कोणत्याही गोष्टीकडे आकर्षित होऊ शकतो. शब्दांच्या माध्यमातून आनंद किंवा दु:ख व्यक्त करता येते. यामुळेच आपल्याला बहुभाषिक कविताही आवडतात. लहानपणी चित्रकला शिकताना के. बी. कुलकर्णी सरांकडून मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते, असे त्या म्हणाल्या.

काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिलेल्या डॉ. आशालता कुलकर्णी यांनी कवयित्रीची कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता याचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या कवितेत अंतरंग अचूकपणे उलगडून दाखविले आहेत. आध्यात्मिक विषयांवर कविता लिहिणाऱया उत्तर कर्नाटकातील त्या एकमेव महिला ठरल्या आहेत, असेही त्या यावेळी म्हणाल्या. शोभा कुलकर्णी यांच्या कविता म्हणजे मार्गदर्शक फलक आहेत. मार्ग आपण निवडायचा आहे, असे मत डॉ. सुषमा पाटणेकर यांनी व्यक्त केले.