|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आदमापूरात बाळूमामांच्या यात्रेला अलोट गर्दी

आदमापूरात बाळूमामांच्या यात्रेला अलोट गर्दी 

प्रतिनिधी/ सरवडे

बाळूमामांच्या नावानं चांगभलं।़।़च्या जयघोषात, भंडाऱयाच्या मुक्तहस्ते उधळणीत व ढोल-कैताळाचा गगनभेदी आवाजात श्रीक्षेत्र आदमापूर ता. भुदरगड येथील संत बाळूमामांचा भंडारा उत्सव उत्साहात सुरू आहे. गेल्या चार दिवसात लाखो भाविकांनी संत बाळूमामांचे दर्शन घेतले. यात्रेतील महाप्रसादाचा लाभ लाखो भाविकांनी घेतला. सकाळपासून सायंकाळ पर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले. पोलिस खात्यांसह स्वयंसेवकांनी नेटके संयोजन व शांतता सुव्यवस्थेत यात्रा पार पाडण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.

भंडारा उत्सवाची सुरूवात चार दिवसापूर्वी झाली असून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालणार आहे. त्यामुळे भाविक आदमापुरावर मोठय़ा संख्येने हजेरी लावत आहेत. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत येणाऱया जाणाऱया भाविकांची रिघ अखंडपणे सुरू आहे. शुक्रवारी रात्री वाघापूरच्या डोणेंची भाकणूक पार पडली. काल सायंकाळपासून संपूर्ण रात्रभर ढोलवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्र-कर्नाटकातील धनगर समाजातील भाविक सहभागी झाले होते. तर भंडारा मिरवणूकीत सर्वच भाविक मोठय़ा भक्तीने रंगून गेल्याचे दिसून येत होते. दोन दिवसापासून ठिकठिकाणच्या पायी दिंडय़ा येत होत्या. यात्रेसाठी एस. टी.ने यात्रेकरूंसाठी सुविधा केली होती. तसेच खासगी व वडापच्या वाहनांनी भाविक ये-जा करत होते. शासनाच्या आरोग्य विभागामार्फत यात्रेकरूंसाठी मोफत आरोग्य सुविधा करण्यात आली होती. आदमापुर मार्गावर ठिकठिकाणी दानशूर व्यक्ती व  मंडळांच्यावतीने हजारो भाविकांना मोफत सरबताचे वाटप करण्यात आले.

यात्रा सुरळीत व शांततेने पार पाडण्यासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशिल भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, सचिव रावसाहेब कोनेकरी, कारभारी मंडळी, आदमापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, व्यापारी संघटना, तरूण मंडळे, पोलिस, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वराज्य फोर्स बिद्री, कमांडो फोर्स, आरोग्य विभाग, ग्रामस्थ आदींनी सहकार्य केले.

 

Related posts: