|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » उष्मा, नोटाबंदीचा आंबा उत्पादकांना फटका

उष्मा, नोटाबंदीचा आंबा उत्पादकांना फटका 

सिंधुदुर्ग : अगोदरच कमी आलेले पिक, वातावरणातील वाढत्या उष्म्यामुळे विक्रीसाठी मोटय़ा प्रमाणावर तयार झालेले उत्पादन आणि त्यात नोटाबंदीमुळे बाजारपेठेतून गायब झालेला रोख पैसा याचा जबरदस्त फटका कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना बसला असून पुन्हा एकदा कर्जाच्या ओझ्याने येथील शेतकऱयांचे कंबरडेच मोडून गेले आहे.

या वर्षी तर आंबा पिक जवळपास 25 टक्केच आले आहे. बदलत्या वातावरणाचे दुष्परिणाम आता थेट शेतकऱयाला भोगावे लागत आहे. अगोदरच आंबा पीक चार आणे. त्यात अचानक थंडी, अचानक उष्मा अशा पद्धतीच्या लहरी हवामानामुळे आंबा पिकाला रिफ्लॉवरींगचा फटका बसला. यात मोठय़ा प्रमाणावर फळगळती झाली व राहिलेली फळेही डागाळली. त्यात सुरुवातीच्या सिझनमध्ये म्हणजे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान कोकणातून आंबा काशी मार्केटला रवाना झाला. या सुरुवातीच्या मालाला तीन ते चार हजार रुपये पेटी असा दर मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, शेतकऱयांची घोर निराशा झाली. त्यांना मोठय़ा फळासाठी पेटीला साधारणपणे 1700 रु., तर सरसकट मालाला पेटीमागे 1000 रुपये एवढा नाममात्र दर एजंट मंडळींकडून मिळाला आणि यात शेतकऱयाचे प्रचंड नुकसान झाले. नोटाबंदीमुळे बाजारातील रोख पैसाच कमी झाल्याने रोख पैसे देऊन आंबा खरेदी करणारी गिऱहाईकेच कमी झाल्याने आंब्याचा खप कमी झाला. त्यामुळे आंब्याची पट्टी उतरावी लागली, असे कारण दलालांकडून शेतकऱयांना देण्यात आले. गतवर्षी मार्चअखेर आंब्याच्या पेटीला तीन हजार ते साडेतीन हजार भाव मिळाला होता. या वर्षी तो 50 टक्केच्याही खाली आल्याने अगोदरच उत्त्पन्न कमी आणि त्यात दर पडल्याने शेतकऱयांचे आणखी नुकसान झाले आहे.

कर्नाटककडून कोकणवासीयांची फसवणूक

दहा वर्षांपूर्वी सिंधुदुर्गातील नर्सरींमधून हापूस कलमे नेऊन त्याची कर्नाटकात मोठय़ा प्रमाणावर लागवड करण्यात आली. तेथील आंबा गतवर्षीपासून बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. तेथील शेतकऱयांनी कोकणातील शेतकऱयांप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर कल्टारचा वापर सुरू केल्याने यावर्षी कर्नाटकचा हापूस कोकणच्या हापूसपूर्वीच मुंबई मार्केटमध्ये दाखल झाला. हा हापूस कोकण हापूसपेक्षाही कमी दराने दलाल मंडळी खरेदी करीत असली, तरी पुढे त्याची विक्री करणारी भैय्या मंडळी हा हापूस देवगड हापूस, रत्नागिरी हापूस या नावाने विकत आहेत. याचाही परिणाम खऱयाखुऱया कोकणी हापूसच्या बाजारपेठेवर झाला आहे.

फसवणुकीसाठी कोकणातील रद्दीचा वापर

फसवणुकीची परिसीमा अशी की, कर्नाटकातील हा हापूस आता कोकणातील महामार्गाच्या दुतर्फा कोकणी हापूस या नावाने विकला जातोय. तसेच कोकणातील मराठी वर्तमानपत्रांची रद्दी खरेदी करून ती कर्नाटकी आंबा पेटय़ा भरण्यासाठी वापरून, सदर आंबा कोकणातील आहे, असे भासवत ग्राहकांची फसवणूकही केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. एवढी फसवणूक होत असतानाही प्रच्ंाड नुकसान सहन करणारा येथील बागायतदार मात्र मूग गिळून गप्प आहे.