|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘सिंधुसरस’कडे जनतेने फिरविली पाठ

‘सिंधुसरस’कडे जनतेने फिरविली पाठ 

कुडाळ : येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर आयोजित ‘सिंधुसरस’कडे लोकांनी पूर्णपणे पाठ फिरविली आहे. सोमवारी सकाळी पालकमंत्र्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रदर्शनाच्या ठिकाणी शुकशुकाट होता. मंगळवार हा प्रदर्शनाचा दुसरा दिवस. यादिवशीही तिकडे कोणीच फिरकले नाहीत. एवढेच नाही, तर जास्तीत-जास्त स्टॉल्सनी आपला गाशा गुंडाळून ते गेल्याचे प्रदर्शनाच्या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.

सिंधुसरस’ कशासाठी, तर दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींचे जीवनमान उंचावून देशातील प्रगत तंत्रज्ञान सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहचवून त्यांचे उत्पन्न किमान प्रतिमहिना दोन हजार रु. व्हावे, असा उद्देश समोर ठेवून राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वयंसहाय्यता गट, स्वरोजगारी यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी अनुदान देण्यात येते. त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने राज्य शासन आणि ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत राज्यस्तरीय महालक्ष्मी सरसच्या धर्तीवर स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादीत मालाची विक्री व प्रदर्शन विभागीय व जिल्हास्तरावर आयोजित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या निर्णयानुसार जिल्हास्तरीय प्रदर्शने होतात.

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील स्वयंसहाय्यता बचतगटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, त्याची विक्री व्हावी. तसेच देशातील आणि राज्यातील प्रगत तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, यासाठी शासनाच्या निर्णयानुसार जिल्हास्तरावर आयोजित होणारे सिंधुसरस हे विक्री व प्रदर्शन आहे. प्रदर्शन आयोजित करण्याची आयोजकांची वेळ चुकली हे नक्की खरं आहे. कारण या कालावधीत कमालीचा उष्मा, त्याचबरोबर गुढीपाडवा, दहावीच्या परीक्षा याचा परिणाम या प्रदर्शनावर झाला. प्रदर्शनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परिपूर्ण अशी सोय नाही. आज तर पिण्याच्या पाण्याची कमतरता होती. पाण्यासाठी लावलेले टँक रिकामी होते. प्रदर्शनाच्या ठिकाणी जबाबदार अधिकारीसुद्धा दिसले नाहीत. दिसले ते कर्मचारी. या प्रदर्शनात सहभागी बऱयाच स्टॉल्सधारकांनीसुद्धा प्रदर्शनाकडे लोक फिरकत नसल्याने परतीची वाट धरली. आजच्या दुसऱया दिवशी तर प्रदर्शन मंडपात पूर्णपणे शुकशुकाट होता. या सर्वांचा विचार केला, तर आलेला निधी कसातरी खर्च करणे एवढाच अर्थ निघू शकतो. आज सायंकाळपर्यंत 20-25 किरकोळ स्टॉल्स तेथे होते.

Related posts: