|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आता राबणार ‘एक दिवस आरोग्य संस्थांसाठी’ उपक्रम

आता राबणार ‘एक दिवस आरोग्य संस्थांसाठी’ उपक्रम 

विजय पाटील/ सरवडे

राज्यातील जनतेला दर्जेदार व परिणामकारक आरोग्यसेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्य विभागाने ठेवले आहे. या उद्दिष्टपुर्तीचा एक भाग म्हणून ‘आरोग्य संस्थेसाठी एक दिवस’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रूग्णालयापर्यंत सर्व आरोग्य संस्थांना वरिष्ठ आरोग्य अधिकाऱयांच्या क्षेत्रभेटी आयोजीत केल्या जाणार असून आरोग्यसेवा-संस्थांमध्ये सोयी-सुविधा, स्वच्छता, साधन सामृग्री, मनुष्यबळ याची तपासणी केली जाणार आहे.

जनतेला चांगल्या व परिणामकारक आरोग्यसेवा देण्याच्या दृष्टीने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पाऊले उचलली आहेत. त्यानुसार आरोग्य संस्थांमध्ये वरिष्ठ अधिकाऱयांच्या क्षेत्रभेटी ठेवल्या असून अधिकारी वर्ग राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये जावून त्यांची तपासणी करणार आहे. आरोग्य संस्थेसाठी एक दिवस या उपक्रमाच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे. त्याअंतर्गत आरोग्यसेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी लोकसहभाग वाढविणे, शासकीय आरोग्य संस्थांबद्दल नागरिकांमध्ये आस्था निर्माण करणे, गरीब व गरजू रूग्णांना पुरक आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याची हमी देणे, स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक-खाजगी भागिदार यांच्या सहयोगातून आरोग्य संस्थांचा विकास व कार्यापालट करण्याचा आराखडा करणे, रूग्णांना तसेच आरोग्य कर्मचाऱयांना भेडसावणाऱया समस्या दूर करणे, आरोग्य कर्मचाऱयांमध्ये कामाप्रती उत्साह वाढविणे, समाजातील सर्व घटकांना आरोग्याच्या विविध योजनांची माहिती देणे, महत्व पटवून देणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत आरोग्य संस्थांना वरिष्ठ अधिकाऱयांच्या कालबध्द क्षेत्र भेटी होणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हा आरोग्य अधिकारी करणार आहेत. तर ग्रामीण व जिल्हा रूग्णालयांच्या भेटीचे नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत केले जाणार आहे. दोन महिन्यातून एकदा नेमून दिलेल्या क्षेत्र अधिकाऱयांच्या भेटी होणार असून वर्षामध्ये सहा भेटी होणे अपेक्षीत आहे. क्षेत्र भेटीमध्ये दुर्गम व अधिवासी भागातील आरोग्य संस्थांचा प्राधान्याने समावेश राहणार आहे. क्षेत्रभेटीनंतर बैठकीव्दारे अडीअडचणी जाणून घेतल्या जाणार आहे.

…………………………………………………………….

        उपक्रमाची उद्दिष्टे

@ आरोग्यसेवा गुणवत्ता सुधारण्यासाठी लोकसहभाग वाढविणे

@ सरकारी दवाखान्याबद्दल लोकांमध्ये आस्था निर्माण करणे

@ गरीब रूग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरविणे

@ देणगीदारांच्या सहकार्यातून आरोग्य संस्थांचा विकास करणे

@ रूग्ण व कर्मचाऱयांच्या दैनंदिन समस्या सोडविणे

@ लोकांना आरोग्याच्या योजनेंचे महत्व पटवून देणे

@ आरोग्य कर्मचाऱयांमध्ये कामाप्रती उत्साह वाढविणे

Related posts: