|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादईच्या अभ्यासासाठी वेळ द्यावी

म्हादईच्या अभ्यासासाठी वेळ द्यावी 

प्रतिनिधी/ पणजी

म्हादई जलतंटा लवादासमोर कर्नाटकाचे साक्षीदार ए. के. गोसाईन यांनी आपण म्हादई प्रश्नी अभ्यास न करता लवादासमोर साक्षीदार म्हणून उभा राहिल्याचे मान्य केले. गोव्याचे वकील आत्माराम नाडकर्णी यांच्या उलटतपासणीला सामोरे जाण्यास कठीण जात असल्याने अभ्यास करण्यास योग्य वेळ द्यावा, अशी विनंती गोसाईन यांनी केल्यावर लवादाने पुढील सुनावणी 31 मार्च 2017 रोजी ठेवली आहे.

प्रा. ए. के. गोसाईन यांनी तयार केलेला अहवाल पूर्णपणे चुकीच्या माहितीवर आधारुन असल्याचा मुद्दा ऍड. नाडकर्णी यांनी मांडला. अभ्याससाठी जो तपशील आपण गोळा केला तो सी. डब्लू. सी अहवालातीलच आहे. त्याला चुकीचे कसे म्हणता येईल, असे प्रा. गोसाईन यावेळी सांगितले. याचाच अर्थ प्रा. गोसाईन यांनी तर्क काढताना सी. डब्लू सी किंवा इतर तयार अहवालाचाच आधार घेतला व स्वत: कधीच स्वतंत्र अभ्यास केला नसल्याचे मान्य केले.

ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी तांत्रिकदृष्टय़ा अनेक प्रश्न विचारले पण त्याची उत्तरे प्रा. गोसाईन देऊ शकले नाहीत. तपशीलावर आपण कोणतेच भाष्य करु शकत नाही, कारण तो तपशील सी. डब्लू सी च्या तांत्रिक सल्लागारांनी तयार केलेला आहे व त्याचे उत्तर आपल्याकडे नसल्याचे त्यांनी मान्य केले.

अहवालाचे केले कॉपी अँड पेस्ट

अर्धा अधिक सी डब्लू सीचा अहवाल जशाचा तसा प्रा. गोसाईन यांनी आपल्या अहवालात कॉपी पेस्ट पद्धतीने घातला आहे. त्याच पद्धतीने आणखी दुसरा कुठल्या अहवालातील भाग जशाच्या तसा जर वापरला असेल तर प्रा. गोसाईन यांनी ते आताच स्पष्ट करावे, अन्यथा गोव्याच्या वकिलांनी परत फिरकी घेऊन आणखी कुठल्या अहवालातील तपशील वापरल्याचे निदर्शनास आणून दिल्यास योग्य होणार नाही असे लवादाने प्रा. गोसाईन यांना सांगून खडसावले.

न्यायालयाचा महत्वाची वेळ वाया घालवू नये, असे सांगताना अभ्यासपूर्ण उत्तरे द्यावीत अशी सूचना लवादाने केली. आपण योग्य अभ्यास केलेला नाही या अहवालावर अभ्यास करण्यास वेळ द्यावी अशी विनंती त्यांनी लवादाला केली. त्यामुळे लवादाने पुढील सुनावणी 31 मार्च रोजी ठेवली.

प्रा. गासाईन यांनी अभ्यास न करताच अहवाल तयार केला आहे. त्यामुळे आपल्याच अहवालावर उत्तर देण्यासाठी त्यांना अहवालाचा अभ्यास करण्यास वेळ मागावी लागते. चालढकल करण्याची कर्नाटकाची ही खेळी असल्याची टिपणी ऍड. नाडकर्णी यांनी यावेळी केली.

केंद्र सरकारच्या पर्यारवण आणि वन मंत्रालयाने नियुक्त केलेल्या सी. डब्लू. सी. समितीने 2014 साली तयार केलेल्या अहवालाचा तपशील आपण पाहिलाच नव्हता असे उत्तर कर्नाटकाचे साक्षीदार प्रा. ए. के. गोसाईन यांनी पहिल्या दिवशी उत्तर दिले होते. दुसऱया दिवशी सी. डब्लू सी चा अहवाल लवादासमोर गोव्याच्या वकिलांनी सादर केला आणि या अहवालातला अर्धा अधिक भाग चोरल्याचे लवादाच्या निदर्शनास आणून दिले तेव्हा सी डब्लू सी च्या अहवालाचा आधार घेऊनच आपण आपला अहवाल तयार केल्याचे गोसाईन यांनी कबूल केले. याचा अर्थ आपणतर अहवाल पाहिलाच नव्हता असे जे लवादाला सांगितले होते ते खोटे होते, असा प्रश्न ऍड. नाडकर्णी यांनी केला. त्यावेळी सारवासारव करुन आपण तसे म्हटलेच नव्हते. सी डब्लू सी 2014 च्या अहवालाची सॉफ्ट कॉपी आपल्याला मिळाली नव्हती व आपण सॉफ्ट कॉपी पाहिली नव्हती असे आपल्याला म्हणायचे होते असे प्रा. गोसाईन म्हणाले.

आधी घोडा की गाडी

प्रा. गोसाईन यांनी आपला अहवाल सप्टेंबर 2015 मध्ये तयार केला व हा अहवाल तयार करण्यासाठी अभ्यास करण्यास त्यानी नोव्हेंबर 2015 मध्ये म्हादई खोऱयाला आणि नदीला भेट दिली, म्हणजे आधी घोडा की आधी गाडी असा प्रश्न ऍड. नाडकर्णी यांनी त्यांना केला. यावेळी प्रा. गोसाईन निरुत्तर झाले. अहवालात जे नमूद केले आहे ते व्यवस्थित आणि योग्य आहे ना त्याची खात्री करायला आपण नंतर भेट दिली पण त्यापूर्वी अनेकवेळा आपण ती नदी पाहिली होती, असे उत्तर त्यांनी दिले.

प्रा. ए के गोसाईन यांचा अहवाल त्यांनी स्वत: केलेला नाही तो आणखीन कोणीतरी तयार केलेला असून प्रा. गोसाईन यांच्या नावाने खपवण्याचा प्रयत्न असल्याची टिपणी यावेळी नाडकर्णी यांनी केली. हा अहवाल जर प्रा. गोसाईन यांचाच असता तर त्यावर अभ्यास करण्यासाठी मुदत मागण्याची त्यांच्यावर पाळी आली नसती असे ते म्हणाले.