|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात लवकरच शासकीय मेडिकल कॉलेज

सिंधुदुर्गात लवकरच शासकीय मेडिकल कॉलेज 

कणकवली : जिल्हा रुग्णालय परिसर व नजीकच्या क्षेत्रात सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यतेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गनगरी येथे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याच्यादृष्टीने कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखालील टीमने जागा व त्या अनुषंगिक बाबींची तपासणी करून आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. हा अहवालही सकारात्मक असून जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात असलेल्या व लगतच्या शासकीय भूखंडाच्या क्षेत्रात हे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्यादृष्टीने ना हरकतही मिळाल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही कालावधीतच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

प्रत्येक जिल्हय़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केले होते. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याचे भाष्यही केले होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात पुढे काय? याबाबतची माहिती उपलब्ध होत नव्हती.

त्री सदस्यीय टीमकडून ‘इन्स्पेक्शन’

दरम्यान, सिंधुदुर्गनगरी येथे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याच्यादृष्टीने जागा व अन्य अत्यावश्यक बाबींची पूर्तता होऊ शकते का? या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी शासनाने कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय टीमला सिंधुदुर्गमध्ये पाठविले होते. सप्टेंबर 2016 मध्ये या टीमने सिंधुदुर्गात येत जिल्हा रुग्णालयाच्या नावे असलेल्या 27.5 एकर व त्याला लगतच असलेल्या प्राधिकरणच्या शासकीय भूखंडात मिळून हे वैद्यकीय महाविद्यालय उभारता येण्याच्यादृष्टीने पाहणी केली होती.

प्रस्ताव सादर

उपलब्ध माहितीनुसार, गोंदिया जिल्हय़ात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानंतर जिल्हय़ात हे वैद्यकीय महाविद्यालय होण्याच्यादृष्टीने कार्यवाही अपेक्षित होती. कारण गोंदीयानंतर यासाठी सिंधुदुर्गचाच नंबर होता. मात्र, आता ही कार्यवाही पुढे सुरू झाल्याचे दिसत आहे. डॉ. रामानंद यांच्या टीमने पाहणी केल्यानंतर उपलब्ध जागेच्या अनुषंगाने शासनाला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल सकारात्मक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लवकरच मान्यता

दरम्यान, ओरोस येथे वैद्यकीय महाविद्यालय बांधायचे झाल्यास त्यासाठी संबंधीत जागेवर इमारत बांधकाम करण्यासाठी संबंधित प्राधिकरणकडून ना हरकत प्रमाणपत्र वैद्यकीय शिक्षण विभागाला मिळणे आवश्यक होते. हे प्रमाणपत्र मिळण्याच्यादृष्टीनेही अंतिम कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  आता वैद्यकीय महाविद्यालय अंतिम मंजुरीचा प्रस्ताव लवकरच कॅबिनेटसमोर येणार असल्याचे सांगण्यात आले. जूनमध्ये पुरवणी मागणीमध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या अनुषंगानेही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली.