|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » ब्राझीलचे वर्ल्डकपमधील स्थान निश्चित, अर्जेन्टिना पराभूत

ब्राझीलचे वर्ल्डकपमधील स्थान निश्चित, अर्जेन्टिना पराभूत 

वृत्तसंस्था/ साओ पावलो

नेमारने प्रतिस्पर्ध्यांचा धसमुसळा खेळ आणि हुकलेली पेनल्टी यावर मात करून गोल नोंदवत ब्राझीलचे रशियात होणाऱया विश्वचषक स्पर्धेतील स्थान निश्चित केले. येथे झालेल्या पात्रता फेरीतील सामन्यात ब्राझीलने पराग्वेवर 3-0 असा एकतर्फी विजय नोंदवला. अन्य एका सामन्यात अर्जेन्टिनाला बोलिव्हियाने 2-0 असा पराभवाचा धक्का दिला.

ब्राझीलचा हा सलग आठवा विजय आहे. मात्र त्यांचे विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित झाले ते अन्य एका सामन्याच्या निकालामुळे. पेरून उरुग्वेवर 2-1 असा धक्कादायक विजय नोंदवल्यामुळे ब्राझीलला गटात चौथे स्थान मिळाले आणि त्यांचे विश्वचकातील स्थानही निश्चित झाले. ब्राझीलचे पात्रता फेरीतील अद्याप चार सामने बाकी असून त्यांचे 33 गुण झाले आहेत. कोलंबियाचे 24, उरुग्वे व चिलीचे 23, अर्जेन्टिनाचे 22 गुण झाले आहेत. अर्जेन्टिना सध्या पाचव्या स्थानावर आहे. गटात अव्वल चार क्रमांक मिळविणाऱया संघांना विश्वचषक स्पर्धेत थेट स्थान मिळणार आहे. पराग्वेचे 18 गुण असून ते सातव्या स्थानावर आहेत.

येथील सामन्यात नेमारविरुद्ध प्रतिस्पर्ध्यानी अनेक फाऊल्स केले. पण 34 व्या मिनिटाला फिलिप कुटिन्होने ब्राझीलचा पहिला गोल नोंदवला. उत्तरार्धात नेमारला पाडविल्याबद्दल ब्राझीलला पेनल्टी मिळाली होती. पण नेमारचा फटका गोलरक्षक सिल्व्हाने उजवीकडे सूर मारत अडविला आणि रिबाऊंड झालेला चेंडूवर नेमारने मारलेला फटका त्याने अचूक थोपवत त्याची ही संधी वाया घालविली. दहा मिनिटानंतर नेमारने त्याची भरपाई करीत ‘सोलो’ गोल नोंदवत ब्राझीलची आघाडी 2-0 अशी केली. सामना संपण्याच्या सुमारास मार्सेलोने आणखी एक गोल नोंदवत ब्राझीलचा एकतर्फी विजय निश्चित केला.

बोलिव्हियाकडून अर्जेन्टिना चकित

ला पाझ येथे झालेल्या सामन्यात बोलिव्हियाने मेस्सीविरहित अर्जेन्टिनाला 2-0 असा पराभवाचा धक्का दिल्याने विश्वचषक पात्रता मिळविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. मेस्सीवर चार सामन्यांची बंदी घातल्याचा निर्णय सामन्याआधी समजल्याने त्या या सामन्यातून बाहेर पडावे लागले. जुआन आर्स, मार्सेलो मार्टिन्स यांनी विजयी संघाचे गोल नोंदवले. कोलंबियाने इक्वेडोरवर 2-0 आणि चिलीने व्हेनेझुएलावर 3-1 असा विजय मिळविल्यामुळे येथील पराभवानंतर अर्जेन्टिना तीनवरून पाचव्या स्थानावर फेकले गेले आहे.