|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » सिमेंटचे दर गगनाला भिडणार

सिमेंटचे दर गगनाला भिडणार 

वृत्तसंस्था /मुंबई :

नोटाबंदीमुळे अन्य उद्योगाप्रमाणेच सिमेंट क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात मरगळ येऊन मंदी निर्माण झाली होती. काही महिने लोटल्यानंतर या परिस्थितीत सुधारणा होऊन सिमेंटला मागणी वाढल्यामुळे त्याच्या किमतीतही वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने उद्योग क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण केल्यामुळे काही काळ मंदीत गेलेल्या या क्षेत्रात आता तेजीचे वातावरण पसरले आहे. परिणामी सिमेंटच्या मागणीत वाढ होऊन बांधकाम उद्योगात पुन्हा सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत, असे श्री सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक एच. एम. बांगूर यांनी सांगितले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात सिमेंटच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली असून, नजीकच्या काळात सिमेंटचे भाव गगनाला भिडतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सप्टेंबर-ऑक्टोबर 2016 मधील स्थिती पाहता सिमेंटच्या किमती खालावल्याचे चित्र होते. जानेवारी 2017 पासून सिमेंटच्या किमतीत वाढ होत असून, याचा विपरीत परिणाम बांधकाम क्षेत्रावर होणार असल्याचे वृत्त ‘मिंट’ने 6 मार्च रोजी  दिले आहे. सिमेंटच्या किमतीत येत्या आठवडाभरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

अँटिक स्टॉक ब्रोकिंग लि. च्या अहवालानुसार गेल्या 6-7 महिन्यांच्या कालावधीनंतर गुजरातमध्ये सिमेंटचे दर चढू लागल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात परिस्थिती अस्थिर आहे. पूर्व भारतात स्पर्धात्मक चित्र आहे. बिहार बाजारपेठेतील वातावरण फेब्रुवारीपेक्षा आशादायक आहे, असे ब्रोकरेजने 10 मार्चच्या अहवालात म्हटले आहे.

प्रति पिशवीमागे 80 ते 100 रुपयांनी वाढ शक्य

गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये सिमेंट पोत्याची किंमत 260-265 रुपये होती.  मात्र, मार्च महिन्यामध्ये प्रतिपिशवीची किंमत 300 रुपये झाली आहे. गुजरात आणि मध्य भारतात किमती अनुक्रमे 20 ते 30 व 10 ते 30 रुपयांपर्यंत अलिकडच्या आठवडय़ात वाढल्या आहेत. नजीकच्या काळात मागणीत वाढ झाल्यास सिमेंटचे दर गगनाला भिडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, ही वाढ प्रति पिशवीमागे 80 ते 100 रुपये होणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.