|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » महाकौशल एक्स्प्रेस दुर्घटनेमागे दहशतवादी कट ?

महाकौशल एक्स्प्रेस दुर्घटनेमागे दहशतवादी कट ? 

 महोबा/ वृत्तसंस्था :

उत्तरप्रदेशच्या महोबा येथे गुरुवारी पहाटे झालेल्या जबलपूर-महाकौशल एक्स्प्रेस दुर्घटनाग्रस्त झाली. या दुर्घटनेत रेल्वेगाडीचे 8 डबे रेल्वेमार्गावरून घसरल्याने 22 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय वर्तविला जात असून उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. रेल्वेमार्गावरील स्थिती पाहता दहशतवादी कट असल्याच्या संशयाला वाव मिळतो असे राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांनी म्हटले. याआधी कानपूरनजीक इंदौर-पाटणा एक्स्प्रेसला झालेल्या भयानक रेल्वे दुर्घटनेमागे देखील दहशतवाद्यांचा हात असल्याचे समोर आले होते.

या रेल्वे दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्याचा आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिला आहे. ही दुर्घटना महोबा-कुलपहाड रेल्वेस्थानकादरम्यान रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्घटनेवेळी रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठे जीवितहानी टळली आहे. या दुर्घटनेनंतर बांदा-झाशी रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून झाशी येथून जाणाऱया अनेक रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक रेल्वेफेऱयांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

वेग कमी असल्याने टळली जीवितहानी

महोबा स्थानकातून रवाना झाल्यानंतर 10 किलोमीटर अंतरावरच एक्स्प्रेस रूळावरून उतरली, दुर्घटनेवेळी रेल्वेचा वेग कमी होता. रूळावरून घसरल्यानंतर महाकौशल एक्प्रेसचे इंजिन काही डब्यांसह काही अंतरापर्यंत गेले, तर 6 डबे रूळावरून घसरले होते. दुर्घटनेची माहिती समजताच सर्व अधिकाऱयांनी तेथे धाव घेत बचाव तसेच मदतकार्याला वेग दिला, 10 जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अलिकडेच 3 मोठय़ा दुर्घटना

याचवर्षी 22 जानेवारी रोजी आंधप्रदेशच्या विजयनगरम जिह्याच्या कुनेरू स्थानकानजीक जगदलपूर-भुवनेश्वर हीराखंड एक्स्प्रेस दुर्घटनाग्रस्त झाल्याने 32 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. तर 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरनजीक पुखरायांमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली. यात 150 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर 200 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. याशिवाय 20 मार्च 2015 रोजी देहरादूनहून वाराणसीला जाणारी जनता एक्स्प्रेस रूळावरून घसरली होती. या दुर्घटनेत 34 जण मारले गेले होते.

 

Related posts: