|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तर्क आणि तथ्याचा आधारावर जम्मू-काश्मिरचा प्रश्न सुटेल

तर्क आणि तथ्याचा आधारावर जम्मू-काश्मिरचा प्रश्न सुटेल 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

गेल्या 70 वर्षापासून जम्मू-काश्मिरचा प्रश्न धगधगत आहे. नव्हे तो काही राष्ट्रविरोधी शक्तींबरोबर काही राष्ट्रांनी आपल्या स्वार्थासाठी आणि दहशतवादी कारवायांसाठी धगधगत ठेवला आहे, असे सांगत आता भारताला त्याच, त्याच प्रयोगांची पुनरावृत्ती करून चालणार नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काही ना काही सीमा रेषा आखावी लागणार असून तर्काच्या आणि तथ्याच्या आधारावर एका निश्चित दिशेने मार्गक्रमण करावे लागणार आहे. त्यासाठी देशातील नागरिकांनी जम्मू-काश्मिरमधील जनतेशी संवाद साधला, तेथील प्रश्नांबद्ल वास्तविकता जाणुन घेतली आणि जागरूकता दाखवली तरच भारतविरोधी दहशतवादी कारवाया रोखता येणे शक्य होईल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत डॉ. आशुतोष भटनागर यांनी व्यक्त केला. शाहू स्मारक भवनमध्ये हिंदू व्यासपीठाच्यावतीने आयोजित व्याख्यान ते बोलत होते.

शाहू स्मारक भवन येथे बुधवारी लोक उत्कर्ष समितीच्यावतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प.पू. डॉ. के. ब. हेडगेवार स्मृती व्याख्य़ानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्य़ानमालेतंर्गत बुधवारी डॉ. आशुतोष भटनागर यांनी ‘जम्मू-काश्मीरः वर्तमान व भविष्य’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. यावेळी डॉ. भटनागर म्हणाले, जम्मू-काश्मिरचे वर्तमान आणि भविष्य या दोन्ही गोष्टी इतिहासाशी संबंधित आहेत. जम्मू-काश्मिरचा प्रश्न गेल्या 70 वर्षांपासून सुटलेला नाही. या प्रश्नाला वाद आणि विवादाचे रूप देवून तेच चित्र समोर आणले जात आहे. वास्तविक या प्रश्नाच्या मूळाशी जावून काही बाबी समजावून घेतल्या पाहिजेत. 1947 साली पाकिस्तानने भारतच्या उत्तर प्रांतातील काही भागावर आक्रमण करून तेथील भूभाग बळकावला. पाकिस्तानच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देताना भारताला काही गोष्टींमध्ये अडथळा आला. या अडथळयांची खरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नाही किंबहूना काही यंत्रणामार्फत तशी व्यवस्था केली गेली, असाही आरोप ज्येष्ठ लेखक डॉ. आशुतोष भटनागर यांनी केला.

Related posts: