|Thursday, May 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » प्रेरणादायी ‘भागवत कथा’

प्रेरणादायी ‘भागवत कथा’ 

‘किंग की किंगमेकर या पर्यायात काहीजण किंग होतात. काही किंगमेकर पण मी किंग नाही आणि किंगमेकरही नाही. मी राष्ट्रभक्त घडवणाऱया माझ्या रा. स्व. संघाचे काम करणार. माझ्या संघटनेसाठी आणि समाजासाठी काम करणे हेच माझे जीवन आहे’ अशा शब्दात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी स्पष्टीकरण दिले. आणि देशभर सुरू झालेल्या एका चर्चेला पूर्णविराम दिला. कोणतीही संघटना अथवा कोणतीही व्यक्ती उगाच मोठी होत नाही. त्यामागे विचार असतो, ध्येय व त्यामागे धावणारी माणसे असतात. अनंत हालअपेष्टा व संकटे सोसून ती वाटचाल करतात आणि त्यांच्या त्यागातून श्रमातून काम उभे रहाते. रा. स्व. संघ ही अशीच विश्वव्यापी संघटना असून या संघटनेचे बळ त्यागात, विचारात आणि आदर्शात आहे. सरसंघचालकांनी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपद स्वीकारणार नाही असे स्पष्ट करून या संघटनेच्या वेगळेपणाची आणि आदर्श परंपरेची पुन्हा नव्याने चुणूक दाखवली.  डॉ. हेडगेवार यांनी ज्या ध्येयाने आणि विचाराने संघाची स्थापना केली आणि स्वराष्ट्र परम वैभवाला नेण्याचे आणि माणसे घडवण्याचे कार्य सुरू केले हे काम आज यशाच्या मुख्य प्रवाहात आले आहे. या कामाला मर्यादा नाही. संघ परिवारातील जनसंघ, भाजपापासून मजदूर संघापर्यंत आणि विद्यार्थी परिषदेपासून जनकल्याण समिती व विश्व हिंदू परिषदेपर्यंत अनेक संस्थांचे व संघटनांचे जाळे आहे हे एका रात्रीत किंवा सत्तेच्या सिंचनाने फोफावलेले नाही. त्यासाठी अनेकांनी सुखावर, संसारी जीवनावर फुली मारून ‘इदं न मम’ म्हणत राष्ट्रकार्याला, संघकार्याला आजन्म वाहून घेतले व त्यातून संघ व संघ परिवार फुलला आहे. देशात भाजपाची सत्ता आली. उत्तर प्रदेशात एक योगी मुख्यमंत्री झाले आणि ‘पार्लमेंट से पंचायत तक शतप्रतिशत भाजपा’ हे उद्दीष्ट साकारताना दिसू लागले. या पार्श्वभूमीवर आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्तारूढ भाजपाचा उमेदवार कोण असणार या संदर्भाने अनेकजण अनेक तर्क बांधत होते. जो तो वेगवेगळी नावे पुढे करत होता. डॉ. मोहन भागवत यांचे नाव चर्चेला आले. त्यांचे शिक्षण, अनुभव, व्यासंग आणि संघाची शक्ती लक्षात घेता हे होणे कठीण नव्हते आणि त्यामध्ये काही अनुचितही नव्हते. पण डॉ. भागवत यांनी योग्य शब्दात या संदर्भात खुलासा करून संघाला पदात नाही तर विचारात, कार्यपद्धतीत आणि त्यागात रस आहे हे दाखवून दिले. यापूर्वीच्या सरसंघचालकांनी विशेष करून गोळवलकर गुरूजी व बाळासाहेब देवरस यांनी संघ विचाराचा व प्रसाराचा जो मार्ग दाखवला तो मार्ग आज हमरस्ता झाला असला तरी त्या मार्गावरचे वारकरी, धारकरी थकलेले नाहीत. मूळ विचारधारेपासून दूर गेलेले नाहीत, जाणार नाहीत याचेच हे प्रसादचिन्ह आहे. महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेची युती सत्तारूढ होणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काय निर्णय घेतात,  कुणाला मुख्यमंत्री करतात की स्वतः हे पद घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दादा कोंडके यांनी ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रात या संदर्भात लिहिले आहे बाळासाहेबांना दक्षिणेत एनटीआर वगैरे चित्रपट कलाकार मुख्यमंत्री झाले या पार्श्वभूमीवर दादा कोंडके मुख्यमंत्री होतील का,  चालतील का असे वाटत होते. दादांनी मातोश्रीवरच्या त्या बैठकीचे वर्णन चरित्रात केले आहे आणि दादांनी बाळासाहेबांनाच विचारले तुम्ही काय होणार तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मी शिवसेनाप्रमुखच राहणार, पाठोपाठ दादा कोंडके म्हणाले, तुम्ही शिवसेनाप्रमुख तर मी शिवसैनिकच. पुढे बाळासाहेबांनी मनोहर जोशींचे नाव सांगितले व आपण सत्तेचा रिमोट कंट्रोल ही भूमिका बजावली. आता तो सारा इतिहास झाला आहे. बाळासाहेबांनी किंगपेक्षा किंगमेकर होणे पसंत केले होते पण, सरसंघचालकांनी आणि रा. स्व. संघाने नेहमीच चांगली माणसे घडवणे, त्यांच्यावर संस्कार करणे आणि त्या माध्यमातून समाजाच्या विविध क्षेत्रात, संस्थात चांगले काम उभारणे यावर भर दिला आहे. कुणाला भाजप व त्यामध्ये चमकणारे काही पुढारी यांचे कौतुक आहे ते स्वाभाविक आहे. पण या साऱयामागे संघाची शक्ती आणि अनेक स्वयंसेवकांनी घरादाराची राखरांगोळी करून अनेक वर्षे निष्ठेने केलेले काम आहे हे विसरता येणार नाही. भाजपात आयारामांची गर्दी वाढत आहे. त्यांना प्रवेशही दिला जातो आहे. पदेही मिळत आहेत. पण, पदापेक्षा, सत्तेपेक्षा संघटना व संघटनेचे काम महत्त्वाचे हा विचार सरसंघचालकांनी एका नकारातून अवघ्या विश्वापुढे आणि जुन्या नव्या स्वयंसेवकापुढे ठेवला आहे. पदावर, सत्तेवर लाथ मारायला आणि ध्येयमार्गावर चालायला हिंमत लागते. डॉ. भागवतांनी ती दाखवली आहे. निश्चितच त्याचे परिणाम दिसतील. भारत हा तरुणांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो आहे. भारतीय संस्कृती परंपरा, कला, शोध उपचार पद्धती यांचे जगभर आकर्षण आहे. संघ शाखांची संख्या वाढते आहे. संघ स्वयंसेवक अनेक सेवा कार्यात पुढाकार घेत आहेत. अशा वेळी हे  काम भोगासाठी मिरवण्यासाठी किंवा स्वार्थासाठी नाही तर त्यागासाठी, राष्ट्र उभारणीसाठी आणि समरसता साधून स्वराष्ट्र परमवैभवाला नेण्यासाठी आहे हे नव्याने संघ परिवारात आलेल्या आणि सत्तेच्या खुर्चीत सुखावलेल्या सर्वांना लक्षात आले तरी ते पुरेसे आहे. भागवतांनी होय म्हटले असते तर काहीच कठीण नव्हते पण, त्यांनी नाही म्हणून जो आदर्श घालून दिला आहे ती आता ‘भागवत कथा’ बनली आहे व ती प्रेरणा देणारीही ठरणार आहे. सव्वाशे कोटींच्या या देशात अनेक प्रतिभावान आणि उच्च गुणवत्तेचे असंख्य लोक आहेत. माणूस ज्ञानाने, कामाने, विचाराने मोठा असतो त्याला संधी मिळाली की तो चमकून दिसतो. भारतमातेकडे अशा नर-नारींची कमतरता नाही. पदापेक्षा विचार व संघटना सेवा महत्त्वाची हा भागवत विचार व त्यानिमित्ताने पुढे आलेली भागवत कथा सर्वांनाच प्रेरणा देईल.

 

Related posts: