|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शासकीय कार्यालये, महाविद्यालयांची कामे दर्जेदार करा

शासकीय कार्यालये, महाविद्यालयांची कामे दर्जेदार करा 

प्रतिनिधी /चिकोडी :

खासदार प्रकाश हुक्केरी यांनी गुरुवारी चिंचणी व वाळकी येथील विविध विकासकामांची पाहणी करून मार्गदर्शन केले. रस्ता व गटार निर्मिती, शादीमहलच्या बांधकामास चालना देण्याबरोबरच चिकोडी येथील जीटीटीसी कॉलेज, सरकारी पदवीपूर्व कॉलेज, सरकारी पदवी कॉलेज व पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या उपसंचालकांच्या कार्यालयीन इमारतींच्या निर्मिती कार्याची पाहणी करून आढावा घेतला.

यानंतर ते म्हणाले, वाळकी येथे एसटी कॉलनीमध्ये 50 लाखांच्या अनुदानातून रस्ता व गटार निर्मिती व इतर ठिकाणी 40 लाखांच्या निधीतून रस्ता व गटारनिर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. चिंचणी येथे एससी कॉलनीमध्ये गटारनिर्मिती व पेव्हरब्लॉक रस्त्याच्या निर्मितीसाठी 50 लाख, थळोबा मंदिराच्या सभाभवनासाठी 12 लाख, तर शादीमहलसाठी 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीद्वारे कंत्राटदार गुलाबहुसेन बागवान व तोटगेर यांना या रस्ता व गटार निर्मितीचे कंत्राट देण्यात आले आहे. सदर कंत्राटदारांनी उत्कृष्ट दर्जाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना केली. आपण मतदारसंघात मूलभूत सुविधा देण्यावर भर दिला असून ही विकासकामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

याआधी आपण राज्य मंत्रीमंडळात लघुउद्योगमंत्री असताना चिकोडी येथे जीटीटीसी कॉलेजला मंजुरी मिळवली व केंद्र, राज्य सरकारकडून 28 कोटींचे अनुदान मंजूर करून आणले. उपलब्ध निधीतून जीटीटीसी कॉलेजचे भव्य दालन उभारण्यात आले असून यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या, टूल रुम, प्राचार्यांसाठी स्वतंत्रकक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे, स्टाफसाठी क्वार्टर्स रस्ता, पथदीप, प्रयोगालय, वाचनालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच सरकारी पदवीपूर्व व पदवी महाविद्यालयास स्वतंत्र इमारतींची पूर्तता करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Related posts: